सुविधांसह समस्यांची जाणून घेतली माहिती
बेळगाव : युवा सबलीकरण व क्रीडा खात्याच्या सरकारी क्रीडा शाळा व महिला क्रीडापटूंसाठीच्या वसतिगृहाला पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी भेट दिली. आपल्या या भेटीत पालकमंत्र्यांनी वसतिगृहाचा परिसर, स्वयंपाक घर, डायनिंग हॉल, विश्रांतीगृहांची पाहणी केली. पालकमंत्र्यांसमवेत बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, महावीर मोहिते, मल्लेश चौगुले व क्रीडा खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी यांनी शुद्ध पिण्याचे पाणी व उत्तम आहाराबरोबरच अंथरुण, स्टडीटेबल पुरविण्याची सूचना केली. या वसतिगृहात आश्रय घेतलेल्या क्रीडापटूंनी कोणत्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आदीविषयी माहिती घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चाही केली. क्रीडापटूंना सर्व सुविधा पुरविण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. गेल्या 30 वर्षांपासून वेगवेगळ्या क्रीडांना प्रोत्साहन देत आलो आहोत. बेळगावच्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करावी, असे सांगतानाच राष्ट्रीय पातळीवरील सायकलिंगमध्ये भाग घेऊन पुरस्कार मिळवलेल्या क्रीडापटूंचे सतीश जारकीहोळी यांनी कौतुक केले.









