अडथळा दूर, सार्व. गणेशोत्सव मंडळांची तयारी
बेळगाव : विसर्जन मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविण्यात आल्या आहेत. चव्हाट गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे चव्हाट गल्ली, कचेरी गल्ली, शनिवार खूट परिसरातील अडथळा ठरणाऱ्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे थाटात आगमन झाले आहे. तर मंगळवार दि. 17 रोजी अनंतचुतदर्शीदिवशी विसर्जन होणार आहे. तत्पूर्वी विसर्जन मार्गातील अडथळे दूर केले जात आहेत. शनिवारी विसर्जन मार्गातील झाडांच्या फांद्या आणि इतर अडथळा ठरणारे साहित्य दूर करण्यात आले आहे.
पुणे, मुंबई पाठोपाठ बेळगावतही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विसर्जन मिरवणुकीला हजारो भक्त गर्दी करतात. यासाठी मंडळाकडून योग्य ती तयारी केली जात आहे. शहरात 350 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. शिवाय मंडळांकडून हलते देखावे आणि आकर्षक मूर्ती प्रतिष्ठापित केल्या आहेत. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीची उंची अधिक आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत अडचणी येऊ नयेत यासाठी विसर्जन मार्गातील अडथळा ठरणारी झाडे आणि एका बाजूला झुकलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. यावेळी सुनील जाधव यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.









