लाईव्ह स्ट्रिमिंगच्या मागणीमुळे चर्चेत अडथळा
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकात्याच्या आरजी कर कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणावर निषेध करणारे ज्युनियर डॉक्टर्स आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील बैठकीचा आणखी एक प्रयत्न शनिवारी निष्फळ ठरला. आंदोलक डॉक्टर शनिवार, 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. यादरम्यान सभेच्या लाईव्ह स्ट्रिमिंगवर ते ठाम राहिल्याने बोलणी फिस्कटल्याचे सांगण्यात आले. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘बैठकीतील चर्चेचे रेकॉर्डिंग केले जाईल, मात्र लाईव्ह स्ट्रीमिंग करता येणार नाही. कारण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे’, असे स्पष्ट केले. मात्र, आंदोलनकर्ते डॉक्टर्स आपल्या मागणीचा आग्रह धरू लागल्याने सायंकाळची बैठक होऊ शकली नाही.
मुख्यमंत्री आणि डॉक्टरांमधील संघर्ष गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास ममता बॅनर्जी स्वत: आरोग्य भवनाबाहेर आंदोलन करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांना भेटायला पोहोचल्या होत्या. 10 सप्टेंबरपासून येथील डॉक्टर आंदोलनाला बसले आहेत. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना चर्चेसाठी येण्याची विनंती केली. ‘माझे पद नाही, तर जनतेचे पद मोठे आहे. मी मुख्यमंत्री नाही, पण तुमची दीदी म्हणून तुम्हाला भेटायला आले आहे’ असे समजावत ममतांनी डॉक्टरांना पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रित केले होते.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शनिवारी दुपारी अचानक कोलकाता येथील ज्युनियर डॉक्टरांच्या आंदोलनस्थळी पोहोचल्या. त्यांनी कनिष्ठ डॉक्टरांना कामावर परतण्याचे आवाहन केले. आपल्या मागण्यांकडे लक्ष देईन आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री ममता यांनी दिले. मात्र, आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्या मागण्यांशी तडजोड करण्यास नकार दिला.









