भाजप आणि काँग्रेसला सर्वाधिक त्रास, प्रादेशिक पक्षांची संख्याही मोठी
वृत्तसंस्था / चंदीगढ
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होत आहे. दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हेच मुख्य पक्ष आहेत. हरियाणात 5 ऑक्टोबरला मतदान होत असून 8 ऑक्टोबरला मतगणना आहे. प्रचाराला रंग चढला असला तरी, अद्याप मुख्य पक्षांनी आपले सर्व उमेदवार घोषित केलेले नाहीत. दोन्ही पक्षांना बंडखोरीची झळ मोठ्या प्रमाणात बसत आहे.
भारतीय जनता पक्षाने प्रथम 90 पैकी 67 उमेदवारांची घोषणा केली होती. 9 विद्यामान आमदारांना यावेळी तिकीटाची संधी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे सहा मतदारसंघांमध्ये या पक्षाला बंडखोरांची दोन हात करावे लागण्याची शक्यता आहे. रणजीत सिंग आणि विश्वंभरसिंग बाल्मिकी या दोन मंत्र्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. माजी मंत्री करणदेव कंबोज आणि रतिया मतदारसंघातील आमदार लक्ष्मण नापा बंडखोरांचे चेहरे म्हणून समोर आले आहे. कंबोज यांनी पक्षतील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. युवा मोर्चाचे नेते अमित जैन यांनीही पदत्याग केल्याने सारे काही आलबेल नाही, अशी स्थिती दिसून येते.
काँग्रेसमध्येही बंडखोरीला ऊत
फारशा विद्यमान आमदारांना काँग्रेसने तिकिटे नाकारली नसूनही या पक्षात किमान एक डझन बंडखोर मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. परिवारवाद किंवा घराणेशाही हरियाणा काँग्रेसमध्ये सर्वाधिक आहे. कलायत मतदारसंघातील एक प्रबळ इच्छुक महिला नेता श्वेता धुल यांनी पक्षनेतृत्वावर घराणेशाहीचा स्पष्ट आरोप केला आहे. पंचकुलाच्या माजी महापौर उपेंद्रकौर अहलुवालिया बंडखोर म्हणून निवडणूक लढणार आहेत. बल्लवगढ मतदारसंघातील नेत्या शारदा राठोड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. प्रबळ इच्छुक आणि माजी आमदार ललित नागर यांनीही अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. भिवानी भाग हा कुस्तीपटूंसाठी ओळखला जातो. या भागातही सत्बीर खटेरा यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. पानिपत मधील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. रोहिता तिवारी यांनी शहर मतदारसंघातून तर विजय जैन यांनी ग्रामीण मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे.









