टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा
वृत्तसंस्था/ढाका (बांगलादेश)
बांगलादेशने भारत दौऱ्यासाठी आपला कसोटी संघ जाहीर केला आहे. भारत द्रौयावर बांगलादेश दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर आता बांगलादेशची नजर टीम इंडियाविरुद्ध शानदार कामगिरीकडे आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी जाहीर केलेल्या संघात हत्येचा आरोप असलेल्या शकीब अल हसनला संघात कायम ठेवण्यात आले आहे. संघाच्या नेतृत्वाची धुरा नजमुल हुसेनकडे सोपवण्यात आली आहे.
दोनच दिवसापूर्वी टीम इंडियाने आपला कसोटी संघ जाहीर केला आहे. यानंतर गुरुवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली. नजमुल हुसेन शांतोकडे नेतृत्वाची धुरा सोपवताना बोर्डाने शरिफूल इस्लाम या स्टार खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याशिवाय, लिटन दास, मेहदी हसन मिराज यांचा संघात समावेश केला आहे. युवा खेळाडू जाकेर अलीची संघात वर्णी लागली आहे. भारताविरुद्ध मालिकेतून तो कसोटी पदार्पण करेल. दुसरीकडे, शकिब अल हसन सध्या त्याच्यावरील खुनाच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. तो बांगलादेशच्या पाकिस्तान दौऱ्यातही संघाचा भाग होता.
बांगलादेश कसोटी संघ – नजमुल शांतो (कर्णधार), शदमन इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकिब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन, जाकेर अली, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, हसन जॉय, नईम हसन, खालेद अहमद.









