विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे टीकास्त्र : कार्यक्रमांवर 600 कोटींची उधळण केल्याचा दावा
पणजी : एका बाजूने महसूलवाढीची आश्वासने देणारे मुख्यमंत्री प्रत्यक्षात मात्र कोट्यावधींची कर्जे घेत सुटले असून सध्या त्यांनी तब्बल 300 कोटीचे कर्ज घेतले आहे. त्याद्वारे आतापर्यंतचे एकूण कर्ज 27489 कोटींच्या घरात पोहोचले आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री अनेकदा आपल्या वक्तव्यांद्वारे महसूल निर्माण करण्याची योजना असल्याचे सांगत असता. खुद्द विधानसभा अधिवेशनातही त्यांनी तसे वचन दिले होते. परंतु स्वत:चाच शब्द फिरवताना त्यांनी कर्जे घेण्यावरच अधिक भर दिला असल्याचे दिसून येत आहे, असे आलेमाव म्हणाले. हे सर्व प्रकार पाहता या सरकारला राज्याची आर्थिक स्थिती आणि भविष्याबद्दल तसूभरही चिंता नसल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रत्यक्षात राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि लोकांचे मन वळविण्यासाठी मुख्यमंत्री महसूल वाढीच्या गोष्टी सांगून लोकांची फसगत करत आहे, असा आरोप आलेमाव यांनी केला. दोन वर्षांनंतर राज्याला कर्जाची गरज पडणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापन आपण केले केले आहे, असे मुख्यमंत्री सावंत सांगतात. प्रत्यक्षात मात्र गोव्याला आर्थिकदृष्ट्या ‘स्वयंपूर्ण’ बनवण्याची त्यांची कोणतीही योजना नाही, असा दावा आलेमाव यांनी केला. वर्ष 2019-20 मध्ये राज्याचे एकूण कर्ज 16894 कोटी ऊपये होते. 2020-21 मध्ये ते 20729 कोटीवर पोहोचले. त्यानंतर 2021-22 मध्ये ते 23271 कोटी ऊपये एवढे वाढले. गतवर्षी 2022-23 मध्ये ती संख्या 24619 कोटीवर पोहोचली आणि आता त्यात आणखी 300 कोटींची भर पडत एकूण कर्ज 27489 कोटींच्या घरात पोहोचले आहे, अशी माहिती आलेमाव यांनी दिली आहे.
तिजोरीत खडखडाट, कार्यक्रमांचा थाटमाट
अशाप्रकारे तिजोरीत खडखडाट असल्यामुळे समाजकल्याणाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची सरकारकडून परवड होत आहे. याऊलट हे सरकार विविध कार्यक्रमांवर मात्र पैशांची मुक्तहस्ते उधळण करत असून आतापर्यंत 600 कोटींपेक्षा अधिक ऊपये खर्च करण्यात आले आहेत. काटकसर हा प्रकारच या सरकारच्या ठायी नाही, आणि महसूल मिळवण्यातही अपयशीच ठरले आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.









