माजी आमदार अंजली निंबाळकर यांचे आवाहन : गॅरंटी अंमलबजावणी कार्यालयाचे उद्घाटन
खानापूर : काँग्रेस सरकार गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी वेगवेगळ्या मार्गानी प्रयत्न करत आहे. निवडणुकीच्या पूर्वी जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सरकारने केली असून या योजना राज्यातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचविण्यासाठी तालुकास्तरीय गॅरंटी योजना अंमलबजावणी कमिटीची नेमणूक केली आहे. या कमिटीने तालुक्यातील प्रत्येक माणसापर्यंत योजना पोहचविण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहन माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी गॅरंटी अंमलबजावणी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते.
यावेळी गॅरंटी अंमलबजावणी कमिटीचे उपाध्यक्ष मंजुनाथ आळवणी, सदस्य शांताराम गुरव, विवेक तडकोड, युसूब हरगी, जगदीश पाटील, रुद्राप्पा पाटील, गोविंद पाटील, संजय गावडे, प्रियांका गावकर, बाबू हत्तरवाड, प्रकाश मादार, दीपा पाटील, इसाकखान पठाण, राजू कुडाळे यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तालुका पंचायत आवारातील इमारतीत फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कमिटीचे सर्व सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते देवदेवतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कमिटीतर्फे निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना अंजली निंबाळकर म्हणाल्या, सरकारने कमिटीच्या माध्यमातून गोरगरिबांची आणि सर्वसामान्यांची सेवा करण्याची जबाबदारी तुमच्यावर दिली आहे. ती चोखपणे पार पाडा आणि सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद घ्या. यावेळी सदस्य प्रकाश मादार यांनी काँग्रेस पक्षाने आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही चोखपणे जबाबदारी पार पाडून पात्र होऊ, असे सांगितले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, महांतेश राऊत, अॅड. आय. आर. घाडी, नगरसेवक तोईद चांदकन्नावर, सुरेश जाधव, सावित्री मादार, यशवंत बिरजे, गुडू टेकडी, दीपा पाटील, प्रकाश मादार, अनिता दंडगल यासह काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









