भारतावर 3-0 फरकाने एकतर्फी मात करून मिळविले यश
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तीन देशांच्या स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात सीरियाकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय फुटबॉल संघाच्या तिसऱ्यांदा इंटरकॉन्टिनेंटल चषक जिंकण्याच्या आशांवर पाणी पडले. जीएमसी बालयोगी अॅथलेटिक्स स्टेडियमवर महमूद अल अस्वाद आणि दालेहो मोहसेन इराणदस्त यांनी अनुक्रमे 7 व्या आणि 77 व्या मिनिटाला सीरियासाठी गोल केला. तर इंज्युरी टाइममध्ये पाब्लो सब्बागने केलेला तिसरा गोल हा सीरियाचे वर्चस्व अधोरेखित करणारा होता.
या निकालाचा अर्थ असा की, मनोलो मार्केझ यांनी भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मोहीम निराशाजनक पद्धतीने सुरू केली आहे. जुलैमध्ये त्यांची नियुक्ती सदर पदावर झाली होती. सीरियाने त्यांच्या सुऊवातीच्या सामन्यात मॉरिशसचा 2-0 असा पराभव केला होता आणि अशा प्रकारे त्यांनी सहा गुणांसह राऊंड-रॉबिन लीगची समाप्ती केली होती. 3 सप्टेंबर रोजी भारत व मॉरिशस यांच्यात झालेला सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता. त्यामुळे भारत आणि मॉरिशसने प्रत्येकी एका गुणासह स्पर्धा संपवली. मॉरिशसविरुद्धचा पहिला सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यामुळे भारताला जेतेपद स्वत:कडेच राखण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते. आधीच्या सामन्यात खेळलेल्या संघात प्रशिक्षक मार्केझ यांनी सात बदल केले. मात्र पाहुण्या संघानेच सर्वप्रथम सामन्यात यश मिळविले.
उत्तरार्धात भारताने थोडी सुधारित कामगिरी केली. 54 व 60 व्या मिनिटाला बरोबरी साधण्याची भारताला नामी संधी मिळाल्या होत्या. पण लालियनझुआला छांगटेचे हे प्रयत्नही वाया गेले. 87 व्या मिनिटाला भारताच्या एडमंड लालरिंडिकाचा गोलच्या दिशेने मारलेला फटकाही अडवला गेला तर 94 व्या मिनिटाला लिस्टन कुलासोलाही संधी साधता आली नाही.
राऊंड रॉबिन लीगनंतर सर्वोच्च क्रमांकावर असलेला संघ स्पर्धा जिंकतो अशी या स्पर्धेची आखणी असून अंतिम फेरीची संकल्पना या स्पर्धेत नाही. भारताने 2018 आणि 2023 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते, तर 2019 मध्ये तिसरे स्थान मिळविलेल्या सीरियाची हा चषक जिंकण्याची पहिली खेप आहे. खरे तर सीरियाने भारतीय भूमीवर विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीरियाला 2007 आणि 2009 मध्ये भारताकडून नेहरू चषकाच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते.
2019 च्या इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये सीरिया तिसऱ्या स्थानावर राहून त्या स्पर्धेतील दोन्ही संघांदरम्यानचा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या शेवटच्या सामन्यात सीरियाने यावर्षी जानेवारी महिन्यात कतार येथे झालेल्या आशियाई चषक स्पर्धेत भारताचा 1-0 असा पराभव केला होता









