वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एटीपी आणि डब्ल्युटीए ताज्या मानांकन यादीत अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ तसेच जेसिका पेगुला यांच्या मानांकनात चांगलीच सुधारणा झाली आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत टेलर फ्रिट्झने पुरूष एकेरीत तर जेसिका पेगुलाने महिला एकेरीत उपविजेतेपद मिळविले. या कामगिरीमुळे एटीपीच्या मानांकनात टेलर फ्रिट्झ सातव्या तर महिलांच्या मानांकन यादीत जेसिका पेगुला तिसऱ्या स्थानावर आहे.
एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम विजेता इटलीचा जेनिक सिनेरने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. त्याने अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचा 6-3, 6-4, 7-5 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. महिलांच्या ताज्या मानांकन यादीत जेसिका पेगुलाने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याच प्रमाणे अमेरिकन टेनिस स्पर्धेत एकेरीची उपांत्यफेरी गाठणाऱ्या इमा नेव्हारोने आठवे स्थान मिळविले आहे. डब्ल्युटीएच्या ताज्या मानांकन यादीत अमेरिकन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीतील विजेती आर्यना साबालेंकाने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. या मानांकन यादीत पोलंडची इगा स्वायटेक पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकन टेनिस स्पर्धेत स्वायटेकला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पेगुलाकडून हार पत्करावी लागली होती. त्यानंतर साबालेंकाने पेगुलावर शानदार विजय मिळविला होता. महिला एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत स्वायटेक पहिल्या, साबालेंका दुसऱ्या, पेगुला तिसऱ्या, रायबाकिना चौथ्या, पावोलिनी पाचव्या, चीनची क्विनवेन सातव्या तर नेव्हारो आठव्या स्थानावर आहे.









