पक्षनेतृत्त्वाविरुद्ध उघडपणे वक्तव्ये करू नका
बेंगळूर : राज्य भाजपमधील मतभेद वारंवार उघड होत असल्याने हायकमांडने हस्तक्षेप केला आहे. पक्षातील असंतुष्ट नेत्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न हायकमांडने केला असून पक्षातील मुद्दे आणि आपल्या पक्षातील नेत्यांविरुद्ध कोणीही उघडपणे वक्तव्ये करू नयेत, अशी ताकीद दिली आहे. पक्षातील नेत्यांवर सातत्याने टीका करणारे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, बी. पी. हरिश, रमेश जारकीहोळी, माजी खासदार प्रतापसिंह, जी. एम. सिद्धेश्वर, माजी आमदार कुमार बंगारप्पा, अरविंद लिंबावळी यांच्यासह अनेक नेत्यांनी काही दिवसांपूर्वी बेळगावमध्ये बैठक घेऊन वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहाराविरुद्ध कुडलसंगमपासून बळ्ळारीपर्यंत पदयात्रा काढण्याविषयी चर्चा केली होती. त्यामुळे सतर्क झालेल्या भाजप हायकमांडने पदयात्रा काढायचीच असेल तर पक्षाच्या चौकटीत राहूनच केली पाहिजे. मागील आठवड्यात कर्नाटक प्रदेश भाजपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह काही नेत्यांनी दिल्लीला जाऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन असंतुष्ट नेत्यांविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर जे. पी. नड्डा यांनी आमदार यत्नाळ याच्यासह सर्व असंतुष्ट नेत्यांशी संपर्क साधून प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे विधाने करू नका. नाराजी असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करा, अशी सूचना दिली.









