कोल्हापूर प्रतिनिधी
कळंबा येथील आदिनाथनगर येथील डॉक्टर दांम्पत्याच्या घरातून 20 तोळ्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले. फेब्रुवारी ते एप्रिल 2020 दरम्यान घडलेला हा प्रकार शनिवारी (7 सप्टेंबर) रोजी उघडकीस आला. याबाबतची फिर्याद डॉ. दीपाली सुभाष ताईंगडे (वय 46) यांनी शनिवारी (दि. 7) करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताईंगडे डॉक्टर दाम्पत्य कळंबा रोडवरील आदिनाथनगर येथे प्लॉट नंबर 14 मध्ये राहतात. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी परदेशात असल्याने हे दोघेच घरी असतात. दोन दिवसांपूर्वी त्यांना कपाटातील दागिने कमी असल्याचे दिसले. सर्व दागिने काढून पाहिले असता, सोन्याचा साडेतीन तोळ्यांचा नेकलेस, साडेसात तोळ्यांचे मणीमंगळसूत्र, चार तोळ्यांची कर्णफुले, चार तोळ्यांच्या बांगड्या आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी गायब असल्याचे लक्षात आले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घरातील वस्तूंची माहिती असलेल्या व्यक्तीनेच चोरी केल्याचा संशय असल्याने पोलिसांनी एका संशयिताकडे चौकशी सुरू केली आहे. लवकरच चोरीचा छडा लागेल, अशी माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.