कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई; निलंबनाची टांगती तलवार
कोल्हापूर प्रतिनिधी
मद्यविक्री परवाना मिळवून देण्याच्या आमिषाने हॉटेल व्यावसायिकाची 1 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षकास जेरबंद करण्यात आले. श्रीकांत नामदेवराव कोल्हापुरे (वय 57, रा. पुणे) असे त्याचे नाव आहे. वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी मिळाल्याने कोल्हापुरेवर निलंबनाची टांगती तलवार आहे. यापूर्वी या गुह्यामध्ये हनुमंत विष्णुदास मुंडे, अभिमन्यू रामदास देडगे, बाळू बाबासाहेब पुरी यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हॉटेल व्यावसायिक हेमंत साळवी यांचे महाबळेश्वर येथे मेघदूत हॉटेल आहे. त्यांना मद्यविक्रीचा परवाना काढायचा होता. यासाठी त्यांनी हनुमंत मुंडे यांच्याशी संपर्क साधला. हनुमंत मुंडे याने मद्यविक्री परवाना मिळवून देतो मात्र, यासाठी 2 कोटी 50 लाख रुपये लागतील असे सांगितले. याबाबत साळवी व मुंडे यांच्यासह अभिमन्यू देडगे, बाळू पुरी, श्रीकांत कोल्हापुरे यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये ठरल्याप्रमाणे 1 कोटी 5 लाख रुपये अॅडव्हान्स स्वरुपात दिले. मात्र सहा महिने झाले तरी मद्यविक्री परवाना मिळाला नसल्याने साळवी यांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. साळवी यांनी पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे परत देण्यास मुंडेसह त्याच्या साथीदारांनी टाळाटाळ केली. यामुळे साळवी यांनी याबाबत पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. यानंतर याची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आली. याबाबत 9 जणांविरोधात वाई पोलीस ठाण्यामध्ये 16 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल केला. याची फिर्याद गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधीक्षक देव़श्री मोहिते यांनी दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून 9 संशयित आरोपी पसार झाले होते. यानंतर या गुह्याचा समांतर तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर विभागाकडून सुरु होता. 27 जुलै रोजी हनुमंत मुंडे याला पुणे येथून अटक करण्यात आली. यानंतर अभिमन्यू देडगे, बाळू पुरी यांना अटक केली. दरम्यान, या गुह्यात सहभागी असणारा संशयित श्रीकांत कोल्हापुरे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. त्याने वाई न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला. यानंतर कोल्हापुरेला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश माळी, पोलीस निरीक्षक वर्षा कावडे, पोलीस अंमलदार विजय कुंभार, निवृत्ती पाडेकर, चालक जमीर मुल्ला, स्वप्नील जाधव यांनी ही कारवाई केली.
10 दिवस मागावर, बसमधून पाठलाग
गुन्हा दाखल झाल्यापासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक कोल्हापुरे याच्या मागावर होते. मात्र तो मिळून येत नव्हता. गेल्या 10 दिवसांपासून गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याचा शोध पुन्हा सुरु केला. याचदरम्यान शुक्रवारी वाई येथील न्यायालयाने कोल्हापुरे याचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला. या अर्जाच्या सुनावणीसाठी कोल्हापुरे न्यायालयात येईल अशी शक्यता होती. मात्र तो हजर राहिला नाही. याच दरम्यान गुन्हे अन्वेषणचे एक पथक तांत्रिक तपास करुन त्याचा माग काढत असताना, कोल्हापुरे मुंबई उच्च न्यायालयात जामीनअर्ज दाखल करण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. तो नाशिक येथून बसने मुंबईला जाणार होता. याच बसमध्ये गुन्हे अन्वेषणचे काही कर्मचारीही बसले होते. यानंतर त्याला खटवली नाक्यावर बस थांबल्यानंतर अटक करण्यात आली.
मूळचा कोल्हापूरचा, पुण्यात स्थायिक
श्रीकांत कोल्हापुरे हा मूळचा कोल्हापूरचा आहे. नोकरीनिमित्त तो पुणे येथे स्थायिक झाला आहे. मात्र त्याचे वडील, भाऊ व इतर परिवार अजूनही कोल्हापुरातील आर. के. नगर परिसरात स्थायिक आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्याच्या घराची झडती घेण्यात येणार आहे. तसेच त्याच्या मालमत्तेचीही चौकशी करण्यात येणार आहे.
गुन्हे अन्वेषण विभागात काम…तेथील अधिकाऱ्यांकडूनच अटक
श्रीकांत कोल्हापुरे हा राज्य गुन्हे अन्वेषणला येण्यापूर्वी स्पेशल पोलीस युनिट (एसपीयू) विभागात कार्यरत होता. या विभागाकडे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी असते. सहा महिन्यांपूर्वीच तो गुन्हे अन्वेषण विभागाकडे आला होता. यानंतरच त्याची चौकशी सुरु झाली.
कोरोना काळात मिटींगसाठी पुण्यातून महाबळेश्वर
कोरोना काळात लॉकडाऊनसदृश परिस्थिती असताना श्रीकांत कोल्हापुरे हा मुंडे याच्यासह अन्य साथीदारांसोबत हेमंत साळवी यांच्याबरोबर मिटींगसाठी महाबळेश्वरला गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याची चौकशी सुरु असून याबाबतचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.