गणेशोत्सवासाठी जमविलेल्या रकमेच्या हिशेबावरुन घडली घटना
कारवार : घरगुती गणेशाची पूजा आणि गणेशोत्सवासाठी जमविलेल्या रकमेच्या हिशेबावरुन निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान चाकूने भोसकण्यात झाले आहे. ही घटना शनिवारी दुपारी साईकट्टा, कारवार येथील साई बिंदू देवस्थानाजवळ घडली. चाकूने भोसकल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव संदेश प्रभाकर बोरकर (वय 31) असे आहे. समजलेली अधिक माहिती अशी, बोरकर कुटुंबीय घरचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शनिवारी साईकट्टा, कारवार येथील आपल्या मूळ घरी एकत्र आले होते. पूजेनंतर कुटुंबियांमध्ये गणपतीची पूजा आणि यापूर्वी गणेशोत्सवासाठी जमा केलेल्या रकमेच्या हिशेबावरुन वाद उफाळून आला. त्यावेळी मनीश किरण बोरकर याने संदेश बोरकर याला चाकू भोसकले. छातीत गंभीर दुखापत झालेल्या संदेशला उपचारासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. चाकूचा वार केलेल्या मनीश आणि त्याला मदत केलेल्या अन्य काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारवार शहर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. दरम्यान संपूर्ण कारवार तालुका गणेशोत्सवात गर्क असताना घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.