सायबर गुन्हेगारांच्या कॉलपासून सावध राहण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन
बेळगाव : मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकारी असल्याचे सांगून महिलांना व्हिडिओ कॉल करून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे नग्न व्हिडिओ बनवून पैशांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा उच्छाद वाढला आहे. अशा टोळीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी केले आहे. शहर सीईएन पोलीस स्थानकात अशाप्रकारची तीन प्रकरणे दाखल झाली आहेत. आपण मुंबई क्राईम ब्रँचमधील अधिकारी आहोत किंवा गुप्तचर खात्यातील आहोत, असे सांगत महिलांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला जातो. केवळ त्यांचा चेहरा वापरून तंत्रज्ञानाच्या मदतीने नग्न व्हिडिओ बनविला जातो.
मोठ्या रकमेची मागणी
व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला नग्न व्हिडिओ पुढे ठेवून मोठ्या रकमेची मागणी केली जाते. पैसे देण्यास तयार नसल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. बेळगाव शहर व उपनगरात अशाप्रकारे महिलांना ब्लॅकमेल केल्याचे तीन गुन्हे घडले आहेत.सायबर गुन्हेगारांकडून सतत कार्यपद्धत बदलली जाते. तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे किंवा अमलीपदार्थांच्या तस्करीत तुमचे नाव आहे, असे सांगत डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सावजांना लुटण्याचे प्रकार वाढले होते. आता यापाठोपाठ गुन्हेगारी प्रकरणात तुमचा सहभाग आढळून आला आहे. तुमची चौकशी करायची आहे, असे सांगत व्हिडिओ कॉल करून महिलांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
आम्ही मुंबई पोलीस दलातून बोलतो
आम्ही मुंबई पोलीस दलातून बोलतो आहोत. तुमची चौकशी करायची आहे, तुम्ही कॅमेऱ्यासमोर या, असे सांगत व्हिडिओ कॉल केला जातो. गुन्हेगारी प्रकरणातील तुमचा सहभाग कुटुंबीय किंवा इतरांना माहिती झाला तर तुमची बदनामी होणार आहे. या प्रकरणात तुमचाच सहभाग आहे की नाही, हे पाहण्यासाठी तुमचे शरीर बघावे लागणार आहे. त्यामुळे कपडे काढा, असे सांगत त्यांना नग्न केले जाते.
टोळ्यांच्या कारवायांपासून सावध राहण्याचे आवाहन
सायबर गुन्हेगारांच्या ब्लॅकमेल प्रकाराला एकदा बळी पडले की, सावजाचा नग्न व्हिडिओ काढला जातो. जर त्यांनी कपडे काढण्यास नकार दिला तर तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचा व्हिडिओ बनवून पैशांसाठी त्यांना ब्लॅकमेल केले जाते. बेळगाव परिसरात अशी तीन प्रकरणे घडली असून महिलांनी अशा टोळ्यांच्या कारवायांपासून सावध रहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी केले आहे.









