गणरायाची भाविकांकडून मनोभावे पूजाअर्चा-आरती : मनोरंजनाचे कार्यक्रम
वार्ताहर/किणये
श्रावण महिन्यानंतर भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवाची साऱ्यांनाच उत्साहाने आतुरता असते. बुद्धीची देवता मानल्या जाणाऱ्या गणरायाची भाविक वेगवेगळ्या पद्धतीने आणि मनोभावे पूजाअर्चा करतात. शनिवारी अगदी जल्लोषात तालुक्यात गणरायाचे स्वागत करण्यात आले. गणराय विराजमान झाले आणि उत्साहाला उधाण आले आहे. कारण येणारे दहा दिवस विविध आध्यात्मिक व मनोरंजन कार्यक्रमाने हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव हा आनंदाची पर्वणी देणारा सण आहे. त्यामुळे विविध गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… असा जयघोष करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात लाडक्या बाप्पाची स्वागत मिरवणूक काढण्यात आली.
घरगुती गणपती मूर्तीची शनिवारी सकाळी प्रतिष्ठापना करण्यात आली तर सर्रास गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना शनिवारी सायंकाळी करण्यात आली आणि विराजमान झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणहोम व सत्यनारायण पूजा करणार आहेत. तर काही मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच मनोरंजनांचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर भाविक घरगुती गणपतीची रोज सकाळी व सायंकाळी विधिवत पूजा करत आहेत. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी सायंकाळी महाआरती करण्यात येत आहे. या गणेशोत्सवानिमित्त गावागावातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.









