सलग सुट्यांमुळे गणेशभक्तांची वर्दळ
► प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी आणि रविवारी सलग सुट्या असल्यामुळे विविध मार्गांवर वाहनांची संख्या वाढली होती. विशेषत: पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणांहून भक्त दाखल झाले होते. भुतरामहट्टी ते निपाणी दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच गणेश चतुर्थीसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली होती. त्यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दोन दिवस सलग सुटी असल्यामुळे मूळगावी परतणाऱ्यांची संख्या वाढली होती. शनिवार-रविवार जोडून सुटी आल्यामुळे पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून येणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली होती. तसेच परिवहनच्या बस तुटवड्यामुळे खासगी बसेसची संख्याही अधिक वाढली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.









