वृत्तसंस्था/ मोक्वि (चीन)
2024 च्या पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेला येथे रविवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघ जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. अलिकडेच भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना 8 सप्टेंबरला यजमान चीन बरोबर होत आहे.
या स्पर्धेमध्ये यजमान चीन, जपान, पाकिस्तान, कोरिया आणि मलेशिया यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी भारतीय पुरुष हॉकी संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले होते. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये भारताने आतापर्यंत चार वेळेला अजिंक्यपद पटकाविले असून हा एक विक्रम आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने या स्पर्धेसाठी जोरदार सराव केला असून पुन्हा यावेळी भारतीय संघ प्रबळ ठरेल अशी आशा कर्णधार हरमनप्रित सिंगने व्यक्त केली आहे.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय हॉकी संघामध्ये काही नव्या युवा हॉकीपटूंना संधी देण्यात आली आहे. पेनल्टी कॉर्नरचा सराव तसेच बचावफळी अधिक भक्कम करण्यासाठी भारतीय हॉकी प्रशिक्षकांनी अधिक भर दिला आहे. जपान, मलेशिया आणि पाकबरोबरच्या सामन्यात भारताची बचावफळी अधिक भक्कम आणि मजबूत राहण्याची आवश्यकता आहे. भारताचा या स्पर्धेतील दुसरा सामना 9 सप्टेंबरला जपान बरोबर होईल. यानंतर 10 सप्टेंबरला विश्रांतीचा दिवस राहिल. भारताचा या स्पर्धेतील पुढील सामना 11 सप्टेंबरला गेल्या वर्षीच्या उपविजेत्या मलेशियाबरोबर तर 12 सप्टेंबरला कोरियाबरोबर होणार आहे. भारत आणि पाक या दोन पारंपरिक संघातील लढत 14 सप्टेंबरला खेळवली जाईल. 16 सप्टेंबरला उपांत्य फेरीचे तर 17 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे.









