वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या संसदेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अफझल गुरु याच्या फाशीसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अब्दुल्ला हे नेहमीच दहशतवाद्यांसंबंधी बोटचेपी भूमिका घेत असतात, अशी टिप्पणी या पक्षाने केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये या महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे.
अफझल गुरु हा काश्मीरातील दहशतवादी होता. त्याला संसद हल्लाप्रकरणी दोषी ठरल्यामुळे फासावर लटकविण्यात आले होते. त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला 9 फेब्रुवारी 2013 या दिवशी फासावर लटकविण्यात आले होते. मात्र, त्यावेळी स्वत:ला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या अनेक विचारवंतांनी त्याला फाशी देण्याच्या निर्णयावर टीका केली होती. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक पक्ष असणारे नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या पक्षांनीही या निर्णयावर टीका केली होती. आजही हे पक्ष अफझल गुरु गुन्हेगार नव्हता, असाच आग्रह धरतात. ओमर अब्दुल्ला यांनी, त्याला फासावर लटकविणे चुकीचे होते, असे वक्तव्य गेल्या शुक्रवारी केले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी टीका केली.
आश्चर्यकारक विरोधाभास
अफझल गुरुला फासावर लटकविण्यात आले, तेव्हा देशात मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील काँग्रेसप्रणित होते. त्याच सरकारच्या सूचनेवरुन तत्कालीन राष्ट्रपतींनी अफझल गुरुच्या फाशीला अनुमती दिली होती. आज जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीत याच काँग्रेस पक्षाशी नॅशनल कॉन्फरन्सने युती केली आहे. तरीही ओमर अब्दुल्ला यांनी हा मुद्दा पुन्हा उकरुन काढला आहे. यावर काँग्रेस पक्षाने अद्याप आपली प्रतिक्रिया दिलेली नाही., अशी स्थिती आहे.









