कॅनडात दहशतवाद्याला अटक : अमेरिकेतील मोठा घातपात टळला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
कॅनडात राहणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला अमेरिकेत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकाने न्यूयॉर्क शहरात ज्यूंवर हल्ला करण्याचा कट रचला होता अशी माहिती अमेरिकेच्या न्याय विभागाने दिली आहे.
20 वर्षीय मुहम्मद शाहजेब खान उर्फ शाहजेब जादूनला अटक करण्यात आली आहे. अॅटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. आरोपीने 7 ऑक्टोबरच्या सुमारास न्यूयॉर्क शहरात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता, इस्लामिक स्टेटच्या नावाखाली अधिकाधिक ज्यूंचे शिरकाण करण्याचे त्याचे लक्ष्य होते. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हमासच्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होणार आहे.
एफबीआयचा तपास आणि कॅनडाच्या कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याचे गारलँड यांनी सांगितले आहे. शाहजेबने न्यूयॉर्कचा प्रवास करणे आणि 7 ऑक्टोबर रोजी ब्रुकलिन येथे एका ज्यू केंद्रावर इस्लामिक स्टेटच्या समर्थनार्थ गोळीबार करण्याचा कट रचला होता.
अंडरकव्हर एजंटच्या जाळ्यात सापडला
शाहजेबने स्वत:च्या कटाचा खुलासा काही लोकांसमोर केला होता. परंतु तो याप्रकरणी ज्या लोकांसोबत बोलत होता, ते अंडरकव्हर एजंट होते. शाहजेबला कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी अमेरिका-कॅनडाच्या सीमेपासून सुमारे 19 किलोमीटर अंतरावरील आर्म्सटाउन शहरात अटक केली आहे. अमेरिका आता खानच्या प्रत्यार्पणाची मागणी कॅनडाकडे करणार आहे.
ज्यू समुदायाची सुरक्षा
अमेरिकेतील ज्यू समुदायाची सुरक्षा केली जाणार आहे. ज्यू समुदायाने द्वेषाने प्रेरित दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य ठरण्याची भीती बाळगू नये असे अॅटर्नी जनरल गारलँड यांनी म्हटले आहे. शाहजेबला अमेरिकेत कधी आणले जाणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.









