वार्ताहर / येळ्ळूर
राजहंसगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या घोडेतीर्थ पठारावरील येळ्ळूर येथील शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या कुरणात धनगरांनी मेंढरे घातल्याने शेतकऱ्यांना ओल्या चाऱ्याची टंचाई भासत आहे. यामुळे त्यांच्या पाळीव प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली असून धनगरांनी येथून आपला ठिय्या उचलावा, अशा आशयाचे निवेदन येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांना ग्रामस्थांनी दिले.
येथील शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करीत असतात. पावसाळभर ओल्या चाऱ्याचा पुरवठा याच कुरणातून होत असताना गेली दोन वर्षे धनगरांनी या कुरणात ठिय्या मांडून मेंढरांना मोकाट सोडले आहे. एकदा का मेंढरे कुरणात फिरली की दुसरी जनावरे तो चारा खात नाहीत. यामुळे चाऱ्याअभावी शेतकऱ्यांच्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शक्यतो पावसाळ्याच्या तोंडावर धनगर आपली मेंढरे घेऊन कमी पावसाच्या प्रदेशात जातात, पण जवळच मिळणारा मुबलक चारा बघता त्यांनी येथेच ठिय्या मांडला आहे. त्यामुळे शे-दोनशे एकरावरील चाऱ्यात मेंढरे मात्र मोकाट फिरत आहेत.
याबाबत ग्रामस्थांनी तक्रार करताच अध्यक्षांनी धनगरांना बोलावून त्यांना आठ दिवसात ठिय्या हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.









