वृत्तसंस्था/ जयपूर
भारतीय संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. आगामी आयपीएलपासून ते या पदाची सूत्रे सांभाळतील, असे या फ्रँचायजींनी शुक्रवारी जाहीर केले.
राजस्थान रॉयल्सने भारतीय संघाचे माजी कर्णधार व माजी प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड यांची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली असून अनेक वर्षांसाठी त्यांच्याशी करार केला आहे, असे या फ्रँचायजीने निवेदनाद्वारे सांगितले. राजस्थान रॉयल्स संघाचे माजी कर्णधार व माजी प्रशिक्षक असलेल्या द्रविड यांनी 2011 ते 2015 या पाच मोसमात संघासोबत काम केले आहे. ते आपला कार्यभार लगेचच सांभाळणार असून रॉयल्सचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट कुमार संगकारा संघाची स्ट्रॅटेजी ठरवणार आहेत. 2011 ते 13 या मोसमात द्रविड यांनी आरआरतर्फे 46 सामन्यांत प्रतिनिधित्व केले, त्यात त्यांनी 29.67 च्या सरासरीने 1276 धावा जमविल्या, त्यात 66 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. यानंतर 2014 पासून ते आरआरचे मार्गदर्शक बनले.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, यू-19 पुरुष क्रिकेट संघ, वरिष्ठ राष्ट्रीय यामध्ये त्यांनी विविध भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने कसोटी, वनडे व टी-20 या तिन्ही प्रकारात अग्रस्थान पटकावले होते. याशिवाय अलीकडेच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपचे जेतेपदही त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने पटकावले होते.









