वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एक्झिट पोलवर नियंत्रण मिळविण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. न्यायालयाने याला राजकीय हितसंबंधित याचिका ठरवून देशाचा कारभार चालवला पाहिजे आणि निवडणुकीची गाथा बंद केली पाहिजे, असे म्हटले आहे. हा मुद्दा हाताळण्यास निवडणूक आयोग सक्षम असून आम्ही निवडणूक आयोग चालवू शकत नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
बी. एल. जैन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यादरम्यान खंडपीठाने महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. निवडणुकीनंतर देशात सरकार निवडून आले आहे. आता निवडणुकीच्या वेळी काय घडले होते याच्यावर विचार करणे थांबवा आणि आता देशाचा कारभार सुरू करा, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. याचिकादार बी. एल. जैन यांनी जनहित याचिकेत अनेक निवडणूक-सर्वेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्यांना पक्षकार बनवले होते. मीडिया हाऊस आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांविरोधात चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.









