ईडी, पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार, ईडी मार्फत चौकशीची मागणी
वारणा डेअरी अॅग्रो इंडस्ट्रीज ली या कंपनीची वार्षीक उलाढाल 500 ते 600 कोटी रुपयांची असतानाही, ही कंपनी अवसायनात दाखवण्याचा घाट संस्थेचे संस्थापक तथा आमदार डॉ. विनय कोरे यांच्याकडून सुरु आहे. या कंपनीच्या लिलावाची प्रक्रिया सुरु असून, जमीन कंपनीची मशनरींची किंमत 225 कोटी रुपयांच्या आसपास असताना केवळ 29 कोटी रुपयांचा विकण्याचा घाट विनय कोरे यांच्याकडून सुरु असल्याचा आरोप माजी आमदार सत्यजीत पाटील – सरुडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच हे प्रकरण मनी लाँड्रीगसारखेच असल्याने याची चौकशी सक्त वसुली संचलनालय (ईडी) तसेच बॅंकीग लोकपाल यांच्या वतीने करण्यात यावी यासाठी दोनही संस्थांकडे अर्ज केल्याचेही सत्यजीत पाटील यांनी सांगितले.
माजी आमदार सत्यजी पाटील म्हणाले, वारणा अॅग्रीकल्चर गुड्स प्रोसेसिंग को – ऑपरेटिव्ह सोसायटी (वॅग्प्कॉस) यां सहकारी संस्थेची स्थापना 1997 साली डॉ. विनय कोरे यांच्यावतीने करण्यात आली. यानंतर 5 जून 2008 पासून हीच संस्था वारणा डेअरी अॅग्रो इंडस्ट्रीज ली. या नावाने सुरु करण्यात आली. यावेळी यासंस्थेचे भागभांडवल 74 कोटी असतानाही 49 कोटी रुपये दाखविण्यात आले. गलथान कारभारामुळे 2021 मध्ये ही संस्था अवसायनात निघली. यानंतर एनसीएलटीच्या वतीने वीरेंद्र कुमार जैन यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली. 2449 सभासदांच्या 26 कोटी भागभांडवलातून उभा राहिलेली संस्था अखेर अवसायनात निघाली. संस्थेची वार्षिक उलाढाल 500 ते 600 कोटी रुपयांची असतानाही संस्था अचानक अवसायानात कशी निघाली असा सवाल सरुडकर यांनी उपस्थित केला. संस्थेने 2008 पासून 2015 पर्यंत 19 बँकामधून 158 कोटी रुपयांची कर्जे उचलली आहेत. बँकांनी एनसीएलटी कडे संस्था अवसायनात काढण्यासाठी नादारी व दिवाळखोरी सहिते प्रस्ताव सादर केला. परिणामी वारणा कंपनीस एनसीएलटीने मालमत्ता तबदील करण्यास मनाई केल्याने अवसायाकाची नेमणूक करण्यात आली. यामुळे संस्था दिवाळखोरीत निघाल्याने संस्थेवरील भागधारकांचा अधिकार संपुष्ठात आला आहे.
कंपनीच्या पारगांव (जि.कोल्हापूर) व बार्शी (जि. सोलापूर) येथे एकूण 280 एकर जमीन आहे. तसेच संस्थेकडे पेट्राप्याक मशिन, आईस्क्रिम प्लांट व सोलापूर जिह्यातील बार्शी येथील 5 चिलिंग प्लांट मशिनरी यांची एकत्रीत किंमत जवळपास 225 कोटी रुपयांच्या घरात जाते. मात्र असे असताना केवळ 29 कोटी रुपये इतकी कमी किंत दाखवून ई लिलावाच्या माध्यमातून संस्थेची मालमत्ता घशात घालण्याचा डाव आमदार विनय कोरे यांच्याकडून सुरु आहे. सोमवार (9 सप्टेंबर) रोजी हा ई लिलाव होणार आहे. याची नोटीसही जाणीवपुर्वक मुंबई, पुणे येथील वृत्तपत्रांना देण्यात आल्याचा आरोपही सरुडकर यांनी केला. आमदार विनय कोरे हे राजकीय वजन वापरुन तसेच बँक व इतर संस्थांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन 225 कोटी रुपयांची मालमत्ता केवळ 29 कोटी रुपयांमध्ये कोणाच्या घशात घालत आहेत. याचा खुलासा त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून करावा अशी मागणी माजी आमदार सत्यजी पाटील सरुडकर यांनी केली.
शिक्षण संस्थेतील चोरी प्रकरणातून खून
वारणा समुहाच्या सर्व संस्थांमधील गलथान कारभारामुळे संस्था अडचणीत येत आहेत. काही ठिकाणी कामगारांचे 27 महिन्याचे पगार थकले आहेत. आपल्या अडचणी झाकण्यासाठी विनय कोरे नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने राहतात. वारणा शिक्षण संस्थेमध्ये आठ वर्षापूर्वी रोकड सापडली होती. ही रोकड नेमकी किती होती याचा आकडा समोर आलाच नाही. तसेच या चोरी प्रकरणातून दोन खून झाल्याचा आरोपही सरुडकर यांनी केला.
लवकरच जनहित याचिका दाखल करणार
आमदार विनय कोरे सध्या महायुतीमध्ये आहेत. केंद्रात व राज्यात त्यांचेच सरकार आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी ईडी व बँकिग लोकपाल निष्पक्षपणे करतील काय याबाबत शंका आहे. मात्र तरीही या दोन संस्थांकडे चौकशी अर्ज केले आहेत. सोबतच पंतप्रधान कार्यालयाकडेही दाद मागण्यात आल्याची माहिती सरुडकर यांनी दिली. या ठिकाणाहून दाद मिळाली नाही तर मात्र मुंबई उच्च न्यालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.