पाच दिवस कोठडीत ठेवण्याचा आदेश
म्हापसा : विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी शिक्षिका सुजल गावडे आणि कनिषा गडेकर या दोघाही निलंबित शिक्षिकांना बुधवारी शिक्षक दिनादिवशी रितसर अटक केली. शाळा व्यवस्थापनाने बुधवारीच या शिक्षिकांचे निलंबन केले होते. दरम्यान या दोघाही शिक्षिकांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित मुलाची प्रकृती योग्य नसल्याने काल गुऊवारी सकाळी त्याला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नऊ वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण प्रकरणातील कोलवाळ पोलिसांच्या एकंदर तपासकामावरच आक्षेप घेत थिवीचे आमदार तथा मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी संबंधित स्थानकाचे निरीक्षक विजय राणे तसेच या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांना (आयओ) तातडीने निलंबित करण्याची मागणी कोलवाळ येथील आपल्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना केली. पीडित मुलाच्या शरीरावर मारहाणीचे तब्बल 32 व्रण असताना पोलिसांनी तपासकामात हयगय केल्याचा आरोप मंत्र्यांनी केला. ही प्रवृत्ती समाजघातक असल्याने अशा बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याच्या मागणीचा त्यांनी पुनऊच्चार केला.
नीळकंठ हळर्णकर पुढे म्हणाले की, विद्यार्थ्याला मारहाणप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी आवश्यक तत्परता दाखवली नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदविताना हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप करीत याप्रकरणी कमकुवत कलमे लावल्याचा दावा मंत्री हळर्णकर यांनी केला. कोलवाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी उडवाउडवीची उत्तरे दिली असून त्यांचा बोलविता धनी अन्य कोणी आहे काय याबाबतही शोध लावणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून या पोलीस अधिकाऱ्याबाबत आपणही पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन बोलणी केली असल्याचे मंत्री हळर्णकर यांनी सांगितले.









