महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्षपदी अॅड. संग्रामसिंह देसाई (सिंधुदुर्ग) यांची निवड
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची बुधवारी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांनी खंडपीठप्रश्नी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक घेण्याबाबत सकारत्मकता दशर्विली आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. सर्जेराव खोत यांनी दिली.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी कोल्हापूरसह सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिह्यातील वकील गेल्या 38 वर्षांपासून आंदोलन करीत आहेत. याप्रश्नी 10 ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये सहा जिह्यातील वकिलांची वकील परिषद झाली होती. या परिषदेला सहा जिह्यातील वकिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खंडपीठाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे ठोस आश्वासन दिले होते.
मुंबई येथे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. सर्जेराव खोत यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची भेट घेतली. या भेटीत मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय आणि खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा होऊन, कोल्हापूर येथे खंडपीठाचे सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत विचारविनिमय झाला. तसेच याप्रश्नी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याविषयी सकारत्मकता दर्शविली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा बारच्या अध्यक्षपदी अॅड. देसाई
महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनच्या कार्यकारणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सर्वानुमते सिंधुदुर्ग जिह्यातील अॅड. संग्रामसिंह देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.