डोंबाऱ्यांच्या मुलींची पोटासाठी तारेवरच्या कसरती, दुसऱ्याच्या मनोरंजनासाठी जीव टांगणीला
रमेश मस्के, सावळज
यात्रा सर्वसामान्यांना आनंद देण्यासाठी तर गरीबांना पोटासाठी पैसे कमविण्यासाठी असते. सावळज येथे नुकत्याच झालेल्या सिध्देवर यात्रेत डोंबाऱ्यांचा खेळ मांडलेले पाहायला मिळाले. वीतभर पोटासाठी दिवसभर तारेवरची कसरत करताना चिमुकल्यांचे बालपण हिरावले जात होतेच पण उदरनिर्वाहासाठी उंच दोरीवर जीव टांगणीला लावल्याचे दिसून आले. या साहसी कलेने दुसऱ्यांना आनंद देणारी डोंबाऱ्यांचे चिमुकले वेदनेची जबाबदारी पार पाडत रस्त्यावरील जीवनात संघर्ष करीत होते.
सावळज येथील श्री सिध्देश्वर देवाची श्रावणातील शेवटच्या शनिवारी व रविवारी मोठी यात्रा भरली होती. या यात्रेत प्रथमच दोन ठिकाणी डोंबाऱ्यांचा खेळ ही मांडण्यात आला होता. डोंबाऱ्यांचे गरीब कुटुंब दिवसभर तारेवरच्या साहसी कसरती करून यात्रेकरूंचे मनोरंजन करीत होते. या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात ही डोंबारी आपली साहसी लोककला जपत असल्याचा आनंद होता. मात्र या डोंबाऱ्यांच्या खेळात चिमुकल्या पोरांच्या आयुष्याचा खेळ झाला असल्याचे दिसून आले.
मात्र या यात्रेत सुमारे १० ते ११ वर्षांची चिमुकली उंच दोरीवर कित्येक तास खेळ करीत आपल्या कलेने यात्रेकरुंचे मनोरंजन करीत होती. दोरीवरून संगीताच्या तालावर पुढे-मागे चालत, तर कधी डोक्यावर अनेक मडकी, पायाखाली दोरीवर कधी रिंग, तर कधी परात घेऊन साहसी कला सादर करीत होती. या कलेने यात्रेकरूंना, त्यांच्या मुलांना आनंद मिळत होता पण दुसऱ्यांना आनंद देणाऱ्या या चिमुकल्या पोरींचा आनंद जबाबदारी खाली दबला गेला होता. वीतभर पोटासाठी बघ्यांनी दिलेल्या बिदागीवरच त्यांचा आनंद अवलंबून होता.
एकीकडे केंद्र व राज्य सरकार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत असताना वास्तव वेगळेच आहे. भटकंती करत गरीब डोंबारी कुटुंब यात्रेत दाखल झाले होते. त्यांनी मांडलेल्या खेळात कोवळ्या जिवांना जीवघेण्या कसरती करायला लाऊन त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उदरनिर्वाह करतानाचे चित्र दिसत होते. मात्र या खेळाने डोंबाऱ्यांच्या पोरांच्या आयुष्याचा व शिक्षणाचाच खेळ खंडोबा झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठीची तारेवरची कसरत शिक्षणापासून दूर गेली आहे.
शिक्षणा पासुन वंचित असणारा हा कोल्हाटी समाजाची ही चिमुरडी आपल्या कुटुंबासमवेत ऊन, वारा, पाऊसची तमा न बाळगता रस्त्यावर कला दाखवत जीवनाशी संघर्ष करीत होती. शासनाच्या विविध सरकारी योजनांपासून वंचित असलेल्या अविकासाच्या दारिद्र्यात लोटलेल्या समाजाला जगण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे हे वास्तव असल्याचे दिसून आले. शिक्षणापासून वंचित तर शासनाच्या विविध योजनांपासून उपेक्षित असलेल्या या समाजाचा संघर्ष संपणार मिळणार हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.
यात्रेत चिमुकल्यांवर विक्रीची जबाबदारी
यात्रा म्हंटले की आनंद पण आनंद देणाऱ्या पदार्थांच्या व वस्तूंच्या विक्रीची जबाबदारी अनेक ठिकाणी चिमुकल्यांवर असलेली पाहायला मिळाली. पोटासाठीचा संघर्षातून जबाबदारीच्या ओझ्याखाली चिमुकल्यांचे बालपण दबले गेले असल्याचे दिसून आले. खेळण्याच्या वयात शिक्षणाचा व आयुष्याचा खेळ झालेल्या मुलांकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.