बेळगाव : सरकारच्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याबरोबरच शेतीच्या खरेदी-विक्रीमध्ये होणारे गैरकारभार रोखण्यासाठी शेती उताऱ्यांना आधार लिंक केले जात आहे. तालुक्यामध्ये 68 टक्के आधार लिंक करण्यात आल्याची माहिती तालुका तहसीलदारांकडून उपलब्ध झाली आहे. शेती उताऱ्यांना आधार लिंक करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना यापूर्वीच आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन शेती उताऱ्यांना आधार लिंक करून घेतले आहे. अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे उतारे आजोबांच्या नावाने दाखल आहेत.
बऱ्याच शेतकऱ्यांनी वारसा केला नाही. त्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. हे अडथळे दूर करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. गावपातळीवर तलाठ्यांच्या माध्यमातून शेती उताऱ्यांना आधार लिंक करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे गाव तलाठी शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन जागृती करण्याबरोबरच सातबारा उतारा आधार लिंक करत आहेत. सध्या तालुक्यामध्ये 68 टक्के आधार लिंक प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्दिष्ट गाठण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती तालुका तहसीलदारांकडून देण्यात आली.
गैरकारभार रोखण्यासाठी आधार लिंक उपयोगी ठरणार
सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच शेतीची नुकसानभरपाई, तसेच बेकायदेशीर खरेदी-विक्री आदी गैरकारभार रोखण्यासाठी आधार लिंक उपयोगी ठरणार आहे. येत्या 15 दिवसांत 80 ते 95 टक्के लिंक प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
-तालुका तहसीलदार, बसवराज नागराळ









