वृत्तसंस्था/ मुंबई
पुरूषांच्या क्रिकेट निवड समितीमध्ये भारताचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज अजय रात्रा याची निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सलिल अंकोला हा या निवड समितीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत होता. आता अंकोलाचे स्थान अजय रात्रा घेणार आहे.
अजय रात्राने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 6 कसोटी आणि 12 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच तो हरियाणा संघाकडून खेळताना 90 प्रथम श्रेणी सामन्यात फलंदाजीत सुमारे 4 हजार धावा तर गोलंदाजीत 240 गडी बाद केले आहेत. अजय रात्राला प्रशिक्षकाचा चांगला अनुभव आहे. यापूर्वीच तो आसाम, पंजाब आणि उत्तर प्रदेश संघाचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता.









