जिल्हा परिषदेतील शाळेंमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणारा उपक्रम -पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा
माझी शाळा आदर्श शाळा हा उपक्रम जिल्हा परिषदेतील शाळेंमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणारा आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, शाळा समितीचे सदस्य, ग्रामस्थ यांनी सहकार्य करून हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत स्व. यशवंतराव सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला कृष्णा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमाला जिल्हा वार्षिक योजनेतून 100 कोटींचा निधी दिला आहे. असा निधी देणारा सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. मागील वर्षी 50 शाळांची निवड करण्यात आली होती. आता जिल्ह्यातील 223 शाळा आदर्श शाळा करण्यात येणार आहे. या शाळेचे काम मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शाळेच्या विकासात शिक्षक, ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा सहभाग महत्वाचा आहे. या सर्वांनी या शाळांना सहकार्य करावे. या उपक्रमामुळे शैक्षणिक गुणवत्तेबरोबर शाळेचा पट देखील वाढणार आहे. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले आहे. या उपक्रमात सर्वांचा सहभाग महत्त्वाचे असल्याचेही पालकमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे म्हणाले, प्रशासनाचे पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आदर्शवत काम चालू आहे. संस्कारक्षम पिढी घालवण्यासाठी आदर्श कुटुंबाची संस्काराची शिकवण शाळेमध्ये द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत सुरुवातीला 50 शाळांचा समावेश करण्यात आला होता. आता या उपक्रमाची व्याप्ती वाढवली असून या अंतर्गत 223 शाळा निर्माण करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीचा मोलाचा सहभाग असणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बैठकांमध्ये माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाचा आढावा घेण्यात यावा. जिल्हा वार्षिक योजनेतून 100 कोटींचा निधी देण्यात आला आहे. ग्रामपंचायतींनीही पंधरावे वित्त आयोगातून या शाळेसाठी निधी खर्च करावा. शाळेतील सोयी सुविधा वाढवण्यासाठी ग्रामस्थ, गावातील नागरिकांबरोबरच बाहेरगावी गावात राहणारे गावातील उद्योजक व्यावसायिक यांचीही मदत घ्यावी. सातारा जिल्हा हा क्रांतीकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो शिक्षण क्षेत्रातही आपण या उपक्रमांतर्गत क्रांती घडवून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन म्हणाल्या, माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत 223 शाळा तयार करण्यात येणार आहे. या शाळांमध्ये भौतिक सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. पटसंख्या व शाळेचे कार्यक्षेत्र यावर शाळेची निवड करण्यात आली आहे. शाळांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत संगणक शिक्षकाची नियुक्ती करावी. या संगणक शिक्षकांचे पगार शासन करणार असल्याचे सांगून त्यांनी माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
यावेळी आनंददायी अभ्यासक्रम या पुस्तिकेचे तसेच शैक्षणिक दिनदर्शिकेचे व शिक्षक मार्गदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. तसेच 2023-24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधील जिल्हास्तरावर प्रथम तीन क्रमांक प्राप्त शाळांना बक्षीस वितरणही करण्यात आले.
या कार्यशाळेत शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रभावती कोळेकर यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच शाळा समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.