वृत्तसंस्था /लीमा (पेरु)
येथे सुरू असलेल्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत महिलांच्या 10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत भारताच्या आरतीने कास्यपदक पटकाविले.
या स्पर्धेत शनिवारी महिलांच्या 10 हजार मी. चालण्याच्या शर्यतीत 17 वर्षीय आरतीने 44 मिनीटे 39.99 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक मिळविताना तिने या पूर्वी म्हणजे गेल्या मार्चमध्ये लखनौत झालेल्या राष्ट्रीय फेडरेशन चषक चॅम्पियनशीप अॅथलेटिक्स स्पर्धेत स्वत:चाच नोंदविलेला राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. लीमामधील या क्रीडा प्रकारात चीनच्या झुमा बैमाने 43 मिनीटे 26.60 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण तर चीनच्या चेनने 44 मिनीटे 30.67 सेकंदाचा अवधी घेत रौप्य पदक मिळविले. या स्पर्धेत भारताचे 43 स्पर्धक सहभागी झाले आहेत. रविवारी या स्पर्धेचा समारोप होत आहे.









