आज काम सुरू करण्याचे दिले आश्वासन : त्वरित रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी
बेळगाव : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक ते माऊती मंदिरपर्यंतच्या रस्त्याच्या दुऊस्तीसाठी शुक्रवारी धर्मवीर संभाजी चौक येथे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील व गल्लीतील नागरिक व युवकांनी रास्तारोको केले. धर्मवीर संभाजी महाराज चौक ते रघुनाथ पेठ अनगोळ येथील जवळपास 120 मीटर लांबीच्या रस्त्यावर नवीन डेनेज लाईन घालण्याचे काम मागील वषी 2023 साली गणेशोत्सव काळातच हाती घेण्यात आले होते. ते काम पूर्ण होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले आहे. पण त्या रस्त्याची सुधारणा करण्यात आली नाही.
या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालक, नागरिक, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना याचा गेल्या वर्षभरापासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच या रस्त्यावरील शहर बससेवा अनगोळच्या शेवटच्या महालक्ष्मी मंदिर बसथांब्यापर्यंत थांबत नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील गल्लीतील युवकांनी, नागरिकांनी धर्मवीर संभाजी चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी अकरा वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले आणि मुख्य रस्त्यावर रास्ता रोको सुरू केले. यावेळी टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजेरी व त्याच्या सहकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि संपूर्ण माहिती घेतली व रास्तारोको न करण्याबाबत विनंती केली. आणि आंदोलकांशी चर्चा करून चौकात थांबून एकाच ठिकाणी आंदोलनाची परवानगी दिली.
गणेशोत्सव येत्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि या रस्त्यावरून हजारो घरगुती गणपती बाप्पाच्या मुर्ती वाहनातून व डोकीवरून घेऊन जातात. तसेच याच मार्गाने सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती जातात. त्यामुळे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त, महापौर, उपमहापौर, दक्षिण भागातील अभियंता यांना गेल्या सहा महिन्यांपासून निवेदने दिली आहेत. पण यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे शुक्रवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. उन्हाळ्यात वाहनचालकांना धुळीमुळे त्रास जाणवत होता तर पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रास होत होता. त्यामुळे आंदोलन करण्यात आले.
यावेळी या भागातील नगरसेविका खुर्शीद मुल्ला यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. महापौर व पालकमंत्री यांच्याशी या रस्त्याबद्दल चर्चा करून या रस्त्याच्या विकासासाठी 25 लाखाचा निधी उपलब्ध करून घेतला आहे आणि पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यांपासून या रस्त्याच्या विकास कामाला सुरू होणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात रस्त्याची डागडुजी करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सहायक अभियंता परशुराम, जे. ई. अजय चव्हाण यांना शनिवारपासून या संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सांगितले. यावेळी या भागातील नागरिकांनी या रस्त्यावरील समस्या सांगितल्या. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, मोहन भांदुर्गे, समाज सेवक राजु पवार, भाऊ कावळे, रमेश शिंदे, गजानन चौगुले, संदिप शहापुरकर मोहीरे, ओमकार चौगुले, बसवराज पाटील तसेच गल्लीतील कार्यकर्ते, युवक व नागरिकांनी आंदोलनात सहभागी दर्शवला.









