प्रांताधिकारी कार्यालयात ग्रामस्थांच्या बैठकीत प्रश्न निकालात, सर्वांनी दिला होकार
बेळगाव : गेल्या वर्षभरापासून राजहंसगड गावांमध्ये सण साजरा करताना वादाचे प्रसंग घडत आहेत. सोमवार दि. 2 रोजी राजहंसगडावर पारंपरिक पद्धतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात राजहंसगड ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वांनी एकजुटीने आणि पारंपरिक पध्दतीने महाप्रसाद व इतर सण साजरे करण्याची सूचना प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी केली. त्याला सर्व ग्रामस्थांनी होकार दिला असून यापुढे धार्मिक कार्यक्रम शांततेत व उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजहंसगडावर श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. त्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये राजहंसगड ग्रामस्थांच्यावतीने दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावर्षीही याचे आयोजन करण्यात आले. मात्र गेल्या काही धार्मिक कार्यक्रमांमध्ये वादावादी घडत आहे. त्यामुळे प्रांताधिकारी श्रवण नाईक, बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक हिरेमठ, धर्मादाय खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही बैठक घेतली आहे. यावेळी सर्व सण पारंपरिक पध्दतीने गावांमध्ये साजरे करावे. महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तो कार्यक्रमही शांततेत पार पाडा, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर सर्व ग्रामस्थांनी होकार दिला आहे. त्यामुळे आता राजहंसगड येथील सर्व कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडणार आहेत.









