डॉल्बीचा वापर न करण्याची सूचना : जिल्हा पोलीस उपअधीक्षक रवी डी. नायक यांचे आवाहन : खानापूर ता. पं. सभागृहात शांतता कमिटीची बैठक
खानापूर : गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत पार पाडण्यात यावा, यासाठी पोलीस आणि इतर प्रशासन सहकार्य करण्यास तयार आहेत. सामाजिक शांतता, सलोखा आणि कायदा सुव्यवस्था ढासळू न देता उत्सव आनंदाने आणि शांततेत पार पाडण्याचे आवाहन जिल्हा पोलीस उपअधीक्षक रवि डी. नायक यांनी शांतता सभेत बोलताना व्यक्त केले. येथील तालुका पंचायतीच्या सभागृहात शांतता सभेचे आयोजन करण्यात आले हेते. व्यासपीठावर तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट, उपनिरीक्षक एम. गिरीश होते.
उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करून गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सण शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. गणपती मंडळासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली असून आवश्यक असलेल्या परवानगी तातडीने देण्यात येतील, डॉल्बीचा वापर करण्यात येऊ नये, आगमन आणि विसर्जन मिरवणुका वेळेत पार पाडावेत, मंडपातील व्यवस्था चोख राखण्यात यावी, मंडपात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा, रुग्णवाहिकेचे नियोजन करण्यात यावे, मंडपात कोणतेही गैरकृत्य होणार नाही याची खबरदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागेल असे कृत्य करण्यात येऊ नये, याची खबरदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, गणेश मंडळाला पोलीस तसेच हेस्कॉम आणि नगरप्रशासन आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशीच ईद ए मिलाद असल्याने सामाजिक सलोखा राखत दोन्ही धर्माच्या नागरिकांनी आपापले सण आनंदाने आणि एकमेकाला सहकार्य करून साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनीही गणेशोत्सव आणि ईद ए मिलादबाबत खानापूर तालुक्याची सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी दोन्ही धर्मियांनी संयमाने आणि शांततेत उत्सव साजरे करावेत, असे ते म्हणाले. यावेळी पंडित ओगले, रवि काडगी, अमृत पाटील, गुड्डू टेकडी यांची भाषणे झाली. या बैठकीला गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









