वृत्तसंस्था /दुबई
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी मानांकनात भारतीय फलंदाजी विराट कोहलीला दोन स्थानांची बढती मिळाली आहे तर कर्णधार रोहित शर्माची एका स्थानाने घसरण झाली आहे. याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वालने सात स्थानांची प्रगती केली आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली आता आठव्या स्थानावर असून रोहित शर्मा चौथ्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज ज्यो रूटने आपले अव्वल स्थान स्थान कायम राखले असून त्याचा संघसहकारी हॅरी ब्रुकने बऱ्यापैकी झेप घेत चौथे स्थान पटकावले आहे. मँचेस्टरमधील कसोटीत शानदार फलंदाजी केल्याचा त्याला फायदा झाला आहे.
याउलट, पाकचा बाबदर आझमची सहा स्थानाने घसरण झाली. तो आता नवव्या स्थानावर आहे तर त्याचा संघसहकारी मोहम्मद रिझवानने प्रगती करीत संयुक्त दहावे स्थान मिळविले आहे. बाबराची संयुक्त तिसऱ्या स्थानावरून घसरण झाली तर रिझवानने सात स्थानांची प्रगती केली. पहिल्या कसोटीत झळकवलेल्या शतकाचा रिझवानला फायदा झाला आहे. बांगलादेशच्या मुश्फिकुर रहीमनेही कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान मिळविले असून सात स्थानांची झेप घेत तो 17 व्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या कसोटीतील शानदार शतकाचा त्याला लाभ झाला आहे. गोलंदाजांमध्ये भारताचा अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनने आपले वर्चस्व कायम ठेवत अग्रस्थान राखले आहे. जसप्रित बुमराह व रवींद्र जडेजा यांनी तिसरे व सातवे स्थान राखले आहे.









