वृत्तसंस्था/मेलबर्न
ऑस्ट्रेलियात 27 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या दहाव्या बिगबॅश लीग क्रिकेट स्पर्धेसाठी भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना बरोबर अॅडलेड स्ट्रायकर्सने नुकताच नवा करार केला आहे. सदर माहिती अॅडलेड स्ट्रायकर्सच्या व्यवस्थापकाने दिली आहे.
डावखुऱ्या मानधनाने यापूर्वी म्हणजे गेल्या तीन बिगबॅश लीग स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. तीने आपल्यापूर्वी ब्रिस्बेन हीट, होबार्ट हुरीकेन्स आणि सिडनी थंडर या संघांचे प्रतिनिधीत्व केले होते. आता ती यावेळी अॅडलेड स्ट्रायकर्स क्लबकडून खेळणार आहे. मानधना ही जागतिक महिला क्रिकेट क्षेत्रातील एक अव्वल फलंदाज म्हणून ओळखली जाते. तिने आतापर्यंत दोनवेळा आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळविला आहे. मानधनाने 28.86 धावांच्या सरासरीने 3493 धावा जमविल्या असून त्यामध्ये 26 अर्धशतकांचा समावेश आहे. 2024 च्या क्रिकेट हंगामात झालेल्या महिलांच्या प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत मानधनाने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचे नेतृत्व करताना या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून दिले. अॅडलेड स्ट्रायकर्सचा या आगामी स्पर्धेतील पहिला सामना ब्रिस्बेन हीट संघाबरोबर 27 ऑक्टोबरला अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे.









