वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमध्ये हवामान खात्याने गुजरातमध्ये तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे चोवीस तासात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पूरस्थितीमुळे राजकोट, आनंद, मोरबी, खेडा, वडोदरा आणि द्वारका येथे लष्कर तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत 17 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे 1 राष्ट्रीय महामार्ग, 34 राज्य महामार्ग, 636 इतर रस्ते आणि 30 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मोरबी, पंचमहाल, खेडा, आणंद आणि वडोदरा येथे परिस्थिती सर्वात वाईट आहे. या जिह्यांमध्ये गेल्या 24 तासांत 12 इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बुधवारीही बंद राहणार असल्याची घोषणा केली आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये वीज पडण्याचा इशाराही दिला आहे. सरकारने लोकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्यास सांगितले आहे.









