चाचणीसाठी पहिले स्वदेशी आरटी-पीसीआर किट सज्ज : मंकीपॉक्सशी लढण्यासाठी एक मोठी उपलब्धी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंकीपॉक्स विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात झपाट्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. मंकीपॉक्सचा विषाणू अद्याप भारतात पोहोचलेला नाही ही दिलासादायक बाब असली तरी त्याची वाढती प्रकरणे पाहता त्याला रोखण्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. याचदरम्यान एका भारतीय आरोग्य उपकरण निर्मिती कंपनीने मंकीपॉक्सबाधीत रुग्ण शोधण्यासाठी रिअल-टाईम किट विकसित केली आहे.
भारताच्या ‘सीमेन्स हेल्थिनर्स’ने मंकीपॉक्सशी लढण्यासाठी स्वदेशी आरटी-पीसीआर चाचणी किट तयार केली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) देखील याला मान्यता दिली आहे. भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमात ही एक महत्त्वाची उपलब्धी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय, मंकीपॉक्सशी लढताना ही किट महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरवर्षी सुमारे 10 लाख किटची निर्मिती
आरटी-पीसीआर चाचणी किट वडोदरा येथील युनिटमध्ये तयार केले जाईल. दरवषी सुमारे 10 लाख किट बनवता येतात. हे किट लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली असल्याचे भारतीय कंपनी ‘सीमेन्स हेल्थिनर्स’ने म्हटले आहे.
आरोग्य क्षेत्रात योग्य आणि अचूक निदानाची गरज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची झाली आहे. भारताला मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी खास डिझाईन केलेल्या किट्स उपलब्ध करून देत आम्ही या आजाराशी लढण्यासाठी सक्रिय दृष्टीकोन घेत आहोत. जलद आणि अचूक निदानाला प्राधान्य दिल्यामुळे या किटमुळे लोकांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाणार आहे, असे सीमेन्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडच व्यवस्थापकीय संचालक हरिहरन सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.









