झारखंडमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक : अटल विचार मंच नाव शक्य
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमध्ये पुढील एक किंवा दोन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या रणधुमाळीत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा देखील राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वत:चा नवा पक्ष स्थापन करू शकतात.
यशवंत सिन्हा यांनी सोमवारी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी समाजाच्या सर्व घटकांशी सल्लामसलत केल्यावर लवकरच अटल विचार मंच स्थापन करण्याविषयी अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. तर यापूर्वी रविवारी आयोजित झालेल्या बैठकीचे अध्यक्षत्व माजी भाजप खासदार जयंत सिन्हा यांचे प्रतिनिधी सुरेंद्र कुमार सिन्हा यांनी केले आणि यात दोन्ही नेत्यांचे समर्थक सामील झाले.
जयंत सिन्हा आणि यशवंत सिन्हा या दोघांच्या समर्थकांनी नव्या पक्षाबद्दल उत्साह व्यक्त करत झारखंडच्या मतदारांसाठी एक नवा पर्याय ठरणार असल्याचा दावा केला आहे. यशवंत सिन्हा यांनी पक्षाचे नाव अटल विचार मंच ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. हा पक्ष दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या तत्वांचे पालन करणार असल्याचे एका समर्थकाने सांगितले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यानी 1998, 1999 आणि 2009 साली हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला होता. तर 2004 च्या निवडणुकीत ते माकप उमेदवार भुवनेश्वर मेहता यांच्याकडून पराभूत झाले होते. 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या वतीने जयंत सिन्हा यांनी हजारीबाग मतदारसंघात यश मिळविले होते. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपने जयंत सिन्हा यांना उमेदवारी नाकारत मनीष जायसवाल यांना संधी दिली होती आणि ते 2.76 लाख मतांनी विजयी झाले होते.









