हेस्कॉमच्या अनागोंदी कारभाराबाबत नाराजीचा सूर : लघुउद्योजक नाराज, हेस्कॉमवर मोर्चा काढण्याची तयारी
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात पूर्वसूचना देऊन वीजपुरवठा खंडित केला जात असताना, ग्रामीण भागामध्ये मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता दिवसभर वीजपुरवठा बंद केला जात असल्याने हेस्कॉमच्या अनागोंदी कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू असून, लघुउद्योजक आर्थिक अडचणीत सापडले असून, लवकरच हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढण्याचाही इशारा उद्योजकांनी दिला आहे.
गणेशोत्सव जवळ येत असल्याने सर्वत्र दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी हेस्कॉमकडून रितसर वृत्तपत्रातून माहिती दिली जाते. परंतु, ग्रामीण भागातील वीजपुरवठा बंद करताना कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे नुकसान होत आहे. विजेवर अवलंबून असलेल्या उद्योगांना याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे.
…तर वृत्तपत्रातून रितसर माहिती देण्याची मागणी
दिवसभरात सहा ते सात वेळा विजेचा लपंडाव सुरू असल्याने नवीन घरबांधणी, लघुउद्योग, स्वयंरोजगार यासह दुकानांनाही फटका बसत आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागात अनेक फूड प्रोसेसिंग तसेच इतर लहान-मोठे कारखाने आहेत. वीजपुरवठाच नसेल तर येथे येणाऱ्या कामगारांचाही रोजगार बुडत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करायचा असेल तर हेस्कॉमकडून वृत्तपत्रातून रितसर माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
मुख्य वीजकेंद्रामध्ये बिघाड झाल्याने समस्या
मागील दोन दिवसात मुख्य वीजकेंद्रामध्ये बिघाड झाल्याने शहरासह ग्रामीण भागावर परिणाम जाणवला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही वेळा जुनाट वृक्ष अथवा फांद्या कोसळून वीजपुरवठा खंडित होत आहे. तो त्वरित दुरुस्त व्हावा, यासाठीही हेस्कॉमचे कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आले आहेत.
विनोद करुर (प्रभारी कार्यकारी अभियंता)









