इस्रो प्रमुखांची माहिती : चंद्रावरून माती-खडकाचे नमुने आणणार : भारतीय अंतराळ स्थानक 2028 मध्ये प्रक्षेपित करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत 2027 मध्ये चांद्रयान-4 प्रक्षेपित करणार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी नुकतीच दिली. चांद्रयान-4 ची रचना अंतिम टप्प्यात असून ही मोहीम केंद्र सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. चांद्रयान-4 चंद्राच्या पृष्ठभागावरून 3-5 किलो माती आणि खडकांचे नमुने पृथ्वीवर आणेल. या मोहिमेनंतर 2028 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक प्रक्षेपित करण्याच्यादृष्टीनेही आतापासूनच तयारी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चांद्रयान-4 मोहिमेंतर्गत अवकाशात पाठवण्यात येणाऱ्या यानामध्ये पाच वेगवेगळे मॉड्यूल असतील. यापूर्वी 2023 मध्ये चंद्रावर पाठवण्यात आलेल्या चांद्रयान-3 मध्ये तीन मॉड्यूल होते. त्यात प्रोपल्शन मॉड्यूल (इंजिन), लँडर आणि रोव्हर यांचा समावेश होता. चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता भारताने पुढील मोहिमांची तयारी सुरू केली असल्याची माहिती इस्रो अध्यक्षांनी दिली. चांद्रयान-4 मोहीम सफल झाल्यानंतर भारतीय अंतराळ स्थानकाचे पहिले मॉड्यूल 2028 मध्ये लॉन्च केले जाईल, अशी माहितीही इस्रो प्रमुखांनी दिली. या मोहिमेमध्ये फक्त रोबोट पाठवले जातील. या स्थानकाच्या माध्यमातून एकूण पाच मॉड्यूल अवकाशात पाठवले जाणार आहेत.
चांद्रयान-4मधील दोन मॉड्यूल चंद्रावर उतरणार
चांद्रयान-4 मोहीम अनेक टप्प्यात पूर्ण केली जाईल. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर, दोन मॉड्यूल मुख्य अंतराळ यानापासून वेगळे होतील आणि पृष्ठभागावर उतरतील. दोन्ही मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करतील. त्यानंतर एक मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावरून प्रक्षेपित होईल आणि चंद्राच्या कक्षेतील मुख्य अंतराळ यानाला जोडेल. नमुने पृथ्वीवर परतणाऱ्या अवकाशयानाकडे हस्तांतरित केले जातील. इस्रोचे शास्त्रज्ञ चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करण्यासाठी रोबोट तयार करत आहेत. तसेच त्याच्या ड्रिलिंग तंत्रज्ञानावर सध्या काम केले जात आहे. नमुने गोळा करण्यासाठी कंटेनर आणि डॉकिंग यंत्रणेचे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.

गगनयानाचे कामही प्रगतीपथावर
गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ उ•ाण मोहीम आहे. या मोहिमेंतर्गत चार अंतराळवीर अवकाशात जाणार आहेत. 2024 किंवा 2025 पर्यंत ही मोहीम सुरू होऊ शकते. गगनयान मोहीम तीन दिवसांची असून त्याअंतर्गत अंतराळवीरांची एक टीम पृथ्वीच्या 400 किमी वरच्या कक्षेत पाठवली जाईल. यानंतर क्रू मॉड्यूल समुद्रात सुरक्षितपणे उतरवले जाईल. जर भारत आपल्या मिशनमध्ये यशस्वी झाला तर असे करणारा तो चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, चीन आणि रशियाने ही कामगिरी केली आहे.
विक्रम लँडर लघु मॉडेल
इस्रोने विक्रम लँडरचे 1200 लघु मॉडेल बनवले आहेत. हे मॉडेल भारताला भेट देणाऱ्या वैज्ञानिक आणि विशेष पाहुण्यांना भेट म्हणून देण्यात येत आहे. गुजरातमधील वडोदरा येथील उद्योजक धवल आणि आदित्य डामर यांनी ही मॉडेल्स तयार केली आहेत. यात 140 सुटे भाग आहेत, जे एकत्र करण्यासाठी अडीच तास लागतात. त्यांनी विक्रम लँडरसोबत प्रज्ञान रोव्हरही तयार केले आहे.









