पशुसंगोपनतर्फे तयारी : पशुवैद्यांना प्रशिक्षण
बेळगाव : पशुपालनाला चालना देण्यासाठी 1 सप्टेंबरपासून 22 वी पशुगणना हाती घेतली जाणार आहे. जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत बुधवारी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेषत: मोबाईल अॅपवरून पशुगणना करण्याचे प्रशिक्षणही दिले गेले आहे. त्यामुळे यावर्षीची पशुगणना स्मार्ट पद्धतीने होणार आहे. जनावरांमधील साथीचे रोग, रोगावरील नियंत्रण करण्यासाठी सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजना आणि प्रकल्प, दुधाचे उत्पादन, दुधाच्या कमी-जास्त होणाऱ्या किमती आणि एकूण पशुधन आणि त्यांचे व्यवस्थापन या सर्व गोष्टींसाठी पशुगणना महत्त्वाची असते. यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. घरोघरी जाऊन ही गणना केली जाणार आहे.
2019 मध्ये शेवटची म्हणजेच 21 वी पशुगणना झाली होती. त्यानंतर आता सप्टेंबरपासून 22 वी पशुगणना होणार आहे. सप्टेंबरपासून सुरू होणारी पशुगणना संपूर्ण प्रक्रिया मोबाईल अॅपद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे एका क्लिकमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. शिवाय जिल्ह्यातील एकूण पशुधन किती? याची माहितीही मिळणार आहे. यासाठी गावोगावी नेमलेल्या पशुसखींचीही मदत होणार आहे. त्याबरोबर पशुगणनेसाठी पशुवैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबरोबर 28 ऑगस्ट रोजी जिल्हा पंचायत कार्यालयात याबाबत बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळीही सविस्तर माहिती दिली जाणार आहे.









