बॉम्ब शोध पथकास कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही; अफवावर विश्वास न ठेवण्याचं महाविद्यालय प्रशासनाचं आव्हान
पेठ वडगाव / प्रतिनिधी
पोलिसांच्या ११२ क्रमांकावर पेठ वडगाव येथील यादव महाविद्यालयात कोणी तरी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आला. पोलिसांच्या बॉम्बशोध पथकाने तात्काळ अलर्ट होत महाविद्यालयास याची माहिती देवून घटनास्थळी दाखल झाले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व प्राध्यापक, कर्मचारी यांना बाहेर काढून वडगाव अग्निशामक दल व श्वानपथकासह बॉम्बशोध पथकाने महाविद्यालयाची चार तास तपासणी केली. यामध्ये काहीही आढळून न आल्याने ही अफवा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सर्वानीच सुटकेचा निश्वास घेतला.
पेठ वडगाव येथील श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाचे लाटवडे रोडवर श्री विजयसिंह यादव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात कोणीतरी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन ११२ क्रमांकावर हर्षद पाटील या नावाने आला. याची माहिती मिळताच तात्काळ पोलीस यंत्रणा अलर्ट मोड येवून महाविद्यालयास याची माहिती देण्यात आली.घटनास्थळी तात्काळ बॉम्बशोध पथक, एटीएस पथक, सीआयडी पथक दाखल झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक चव्हाण यांनी तात्काळ याची माहिती कर्मचारी व प्राध्यापक यांना देवून परिस्थिती संयमाने हाताळत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयास सुट्टी देण्यात आल्याचे सांगून महाविद्यालयाबाहेर सोडण्यात आले. महाविद्यालयाचा वडगाव-लाटवडे रस्त्यावर बॅरीकेट लावून नाकाबंदी करण्यात आली. वडगाव पालिकेची अग्निशामक दल व रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात ठेवण्यात आली.
बॉम्बशोध पथक दाखल होताच ज्या विद्यार्थ्याच्या दप्तरच्या बॅगा व महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी यांच्या बॅगा महाविद्यालयात होत्या त्या तपासण्यात आल्या. महाविद्यालयाची तीन मजली इमारतीतील वर्ग बेला श्वानपथकाच्या सहाय्याने तपासणी केली. याचबरोबर महाविद्यालयाचे क्रीडांगण, कॅन्टीन प्रयोगशाळा, कार्यालय, ग्रंथालय, वाचनालय, ऑफिस, स्टोअर रूम, आदी ठिकाणांचा तपास केला. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
याची माहिती पोलीस प्रशासनाने माध्यमांना दोन वाजता दिली असता सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. महाविद्यालयात बॉम्ब असल्याची माहिती सोशल मिडीयावर पसरताच वडगाव व परिसरात एकच खळबळ उडाली होती. विद्यार्थी व पालकात भीतीचे वातावरण झाले. अनेक पालकांनी महाविद्यालयाकडे धाव घेत मुलांना घरी घेवून गेले.सुमारे चार तास अत्यंत दक्षतेने व अगदी लहान लहान वस्तूंचीही तपासणी बॉम्बशोध पथकाने केली. वडगाव शहरात प्रथमच बॉम्ब असल्याच्या अफवेच्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली होती. पोलीस यंत्रणेचीही मोठी धावपळ उडाली होती. घटनास्थळी आमदार राजूबाबा आवळे यांनी भेट देवून माहिती घेतली.
पोलिसांनी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसून पुढील तपास सुरु असल्याची माहिती दिली असून कॉल कोणी केला याची माहिती पोलीस प्रशासन घेत असल्याचे पोलीसनी सांगितले. यावेळी दहशतवाद विरोधी पथकाचे एपीआय आप्पासो बाबर, शिल्पा यमगेकर, बॉम्ब शोध व नाश पथकाचे प्रविण मगदूम व टीम यांना कार्यवाहीसाठी वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि भुजगोंडा पाटील, पोलीस कर्मचारी योगेश राक्षे, महेश गायकवाड, जितेंद्र पाटील, अमोल आष्टेकर, मिलिंद टेळी आदी पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.
विद्यार्थी पालकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये : प्राचार्य चव्हाण
विजयसिंह महाविद्यालयात बॉम्ब अथवा कोणतीही संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळून आलेली नाही. विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालय शुक्रवारी दि.२३ रोजी नियमित सुरु राहील अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक चव्हाण यांनी दिली.








