भाजप प्रदेशाध्यक्ष-खासदार सदानंद तानावडे यांची माहिती : पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळांचा धडाका सुरु
पणजी : येत्या दि. 1 सप्टेंबरपासून भाजपतर्फे राज्यस्तरीय प्राथमिक सदस्यता मोहीम प्रारंभ करण्यात येणार असून ‘मिशन गोवा’ हे ध्येय ठेऊन प्रत्येक व्यक्तीला या मोहिमेचा भाग बनविण्याचे प्रयत्न होतील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे यांनी दिली. बुधवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस दामू नाईक, राज्य सचिव सर्वानंद भगत, माजी खासदार नरेंद्र सावईकर आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग
दि. 16 ऑगस्ट रोजी या मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर दि. 17 रोजी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर कार्यशाळा घेण्यात आली. त्यासाठी गोव्यातून तानावडे यांच्यासह दामू नाईक, नरेंद्र सावईकर, सर्वानंद भगत, सिद्धार्थ कुंकळकर, समीर मांद्रेकर, दीपक नाईक आदी पदाधिकारी उपस्थित राहिले होते. काल बुधवारी गोव्यात राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मिनेझीस ब्रागांझा सभागृहात झालेल्या या कार्यशाळेस भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे तसेच प्रभारी आशिष सूद यांच्यासह केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दामू नाईक, नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, आदींची उपस्थिती होती. कार्यशाळेस पक्षाचे सर्व आमदार, मंत्री, पदाधिकारी, सदस्य, सर्व मोर्चांचे अध्यक्ष, दोन्ही जिल्हा अध्यक्ष, यांचीही उपस्थिती होती.
आज जिल्हास्तरीय कार्यशाळा
याच कार्यक्रमांतर्गत आज दि. 22 रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा होणार आहेत. त्यासाठी दोन्ही जिह्यांसाठी आयोजन समित्यांचीही निवड करण्यात आली आहे. त्यावेळी दिल्लीत प्रशिक्षण घेतलेले पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. पैकी उत्तरेतील कार्यशाळा म्हापसा भाजप कार्यालयात तर दक्षिणेतील कार्यशाळा मडगाव भाजप कार्यालयात होणार आहे.
चाळीसही मतदारसंघांत कार्यशाळा
त्यानंतर दि. 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान सर्व चाळीसही मतदारसंघांमध्ये कार्यशाळा होतील. त्यावेळी प्रत्येक मतदारसंघाचा आमदार, मंत्री किंवा मतदारसंघ प्रमुख यांच्याकडून मंडळ स्तरीय कार्यकर्ते, मोर्चा सदस्य, मतदारसंघ समिती, पंचसदस्य, अन्य लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
मिस्ड् कॉल द्या… भाजपचे सदस्य व्हा !
दि. 31 रोजी शक्ती केंद्रांसाठी कार्यशाळा घेण्यात येईल. त्यानंतर दि. 1 सप्टेंबरपासून राष्ट्रीय स्तरावर सदस्यता मोहीम प्रारंभ होईल. त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रथम सदस्य म्हणून नोंदवून घेण्यात येईल. त्यानंतर 8800002024 या मिस्ड् कॉल क्रमांकाचे अनावरण करण्यात येईल. या क्रमांकाच्या माध्यमातून कुणालाही सदस्य बनता येणार आहे. यापूर्वी 2014 मध्ये अशाच प्रकारे सदस्यता मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी गोव्यातून 3.30 लाख जणांची नोंदणी करण्यात आली होती. यावेळी ती संख्या निश्चितच जास्त असेल, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने झटावे, प्रयत्न करावे, असे आवाहन तानावडे यांनी केले.
भाजप मुख्यालयाची 24 रोजी पायाभरणी
दरम्यान, येत्या दि. 24 भाजप मुख्यालयासाठी अत्याधुनिक कार्यालय बांधकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. कदंब पठारावर बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची पायाभरणी करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गोव्यात येणार आहेत. सकाळी 11 वाजता हा सोहळा होणार असून कार्यकर्ते व अन्य जनतेसाठी ताळगाव येथे सामाजिक सभागृहात त्याच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पायाभरणी नंतर नड्डा यांचे याच सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती तानावडे यांनी दिली.









