बंगलो एरियाचा प्रस्तावामध्ये समावेश : हस्तांतरणासाठी महत्त्वाची बैठक : संपूर्ण प्रदेशाचे सर्वेक्षण करून तयार करण्यात आला अहवाल
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण करताना नागरी वसाहतींसह बंगलो एरिया हस्तांतरित करण्याची मागणी नागरिकांतून होत होती. नागरिक तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंटचे सर्वेक्षण केले असून मिलिटरीची 928 एकर जागा सोडून उर्वरित जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी बैठकीत दिली. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतरणासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. स्टेशन कमांडर अधिकाऱ्यांसोबत बेंगळूर येथील डीईओ कार्यालयाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
प्रारंभी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मागील महिन्याभरात झालेल्या सर्वेक्षणाची पूर्ण माहिती दिली. कॅन्टोन्मेंट बोर्डकडे एकूण 1763 एकर जमीन असून त्यापैकी 112 एकर जमीन कॅन्टोन्मेंटने सहमती दर्शविली होती. परंतु यामध्ये बंगलो एरियाचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे या संपूर्ण प्रदेशाचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मिलिटरीची 928 एकर जमीन वगळता इतर सर्व जमीन महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. या प्रस्तावाबाबत अधिक सविस्तर चर्चा करून त्यानंतर तो राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविला जाणार आहे. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव तो प्रस्ताव मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे पाठविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. लोकप्रतिनिधींनीही बैठकीत विचार मांडले. या बैठकीला खासदार इराण्णा कडाडी, आमदार राजू सेठ, कॅन्टोन्मेंट सीईओ राजीव कुमार, महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निपाणीकर, कॅन्टोन्मेंटचे अभियंता सतीश मण्णूरकर, रहिवासी संघटनेचे डॉ. नितीन खोत, रंजन शेट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कॅम्पच्या वेस्टर्न पार्टमध्ये मिलिटरी स्टेशन उभारणार
कॅन्टोन्मेंट हद्दीतील 96 एकर जागेत मिलिटरी डेअरी फार्म पसरला आहे. ही जागाही महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली जाणार आहे. या ऐवजी कॅन्टोन्मेंटला बी-4 जमीन दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. याबरोबरच कॅम्पच्या वेस्टर्न पार्टमध्ये मिलिटरी स्टेशन उभारले जाण्याची प्राथमिक चर्चा या बैठकीत करण्यात आली.









