सभागृहाचा आदर करणार कोण? बुधवारी कर्मचाऱ्यांनी सभागृह केले स्वच्छ
बेळगाव : महानगरपालिकेच्यावतीने बोलाविलेल्या बैठकीमध्ये चहा, ड्रायप्रूट यांची व्यवस्था केली जाते. सभागृहामध्येच हे दिले जाते. त्यानंतर दुपारी जेवणाची सोयही केली जाते. मात्र, नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये काही नगरसेवकांनी मनपा कर्मचाऱ्यांकडे भडंग आणि भजीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. त्यानुसार त्या कर्मचाऱ्यांनी त्यांची व्यवस्था केली. मात्र, सभागृहात विविध ठिकाणी चुरमुरे विखरून पडले होते. यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना त्याची साफसफाई करावी लागली.
सभागृहाचा मान ठेवणे तसेच स्वच्छता राखणे हे प्रत्येक नगरसेवकाचे काम आहे. मात्र, गेल्या काही बैठकींमध्ये पाहता अनेकवेळा अवमानाच्या घटना घडल्या आहेत. स्वच्छतेच्या बाबतीतही असाच प्रकार दिसून येत आहे. महापौरांच्या आसनासमोरच भडंग पडला होता. यामुळे एक प्रकारे तो महापौरांचा अवमानच आहे, असे बोलले जात आहे. महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सर्वत्र कापडी कार्पेट पसरविण्यात आले आहे. जर तेलकट जिन्नस खाऊन त्याचठिकाणी फेकून देण्यात आले तर उंदरांचा सुळसुळाट वाढणार आहे. परिणामी कार्पेटही कुरतडून टाकण्याची शक्यता आहे.
सभागृहामध्ये कोणत्याही प्रकारच्या नाष्ट्याची व्यवस्था केली तरी शिस्तबद्धरीत्या ते खाल्ले पाहिजे. कोठेही फेकून देणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानावर अधिक भर दिला आहे. मात्र महानगरपालिकेतच असा प्रकार घडल्याचे दिसून येत असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. चुरमुऱ्यासारखे पदार्थ खाताना ते खाली पडतात. तेव्हा प्रत्येकाने काळजीपूर्वक खाल्ले पाहिजेत. एखाद्या वेळी चुकून पडले तरी तातडीने गोळा करणे गरजेचे आहे. महापौरांच्या आसनासमोरच चुरमुरे पडले होते. त्यामुळे कोणालाच याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून आले. बुधवारी संपूर्ण सभागृह स्वच्छ करण्यात आले. कौन्सिल विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.









