उपराष्ट्रपती जगदीप ढंकर यांचे प्रतिपादन, संयुक्त संघर्ष करण्याचे विश्वसमुदायाला आवाहन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हवामानात होणारे घातक परिवर्तन हा मानवतेसमोरचा सर्वात मोठा धोका आहे. या धोक्याला जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन रोखण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती जगदीप ढंकर यांनी केले आहे. ते बुधवारी कन्फेडरशेन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) या संस्थेच्या 19 व्या महाधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात आपले भाषण करीत होते.
हवामानातील परिवर्तनामुळे नैसर्गिक चक्र प्रभावित झाले आहे. त्यामुळे दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा टोकाच्या स्थितींशी दोन हात करावे लागत आहेत. अन्नपुरवठ्यावरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे मानवाने त्याच्या प्रगतीसाठी आणि अस्तित्वासाठीही निसर्गाशी जुळवून घेण्याची वेळ आली आहे. वातावरण परिवर्तन असेच होत राहिल्यास मानवासमोर गंभीर संकट उभे राहणार असून त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
दक्षिण-दक्षिण सहकार्य
गेल्या वर्षी भारताकडे जी-20 संघटनेचे अध्यक्षपद होते. या अध्यक्षपदाच्या काळात भारताने आफ्रियन युनियन या संघटनेला या संघटनेचे स्थायी सदस्यत्व मिळवून देण्यात पुढाकार घेतला होता. याचा भारताला मोठा अभिमान वाटतो. आफ्रिका हे भारताच्या सर्वाधिक प्राथमिकतेचे क्षेत्र आहे. आफ्रिका आणि भारत यांच्यातील सहकार्य दक्षिण-दक्षिण सहकार्याचा पाया आहे. भारत आणि आफ्रिका यांच्यात परस्पर सन्मान आणि परस्पर सहकार्य वाढविणारी व्यवस्था स्थापन केली जात आहे. हे दोन प्रदेश जगाचे भविष्य आहेत. या दोन प्रदेशांच्या परस्पर संबंधांचा एक मोठा इतिहास असून संपन्न मानवतेचे ध्येय साध्य करण्यासाठी हे सहकार्य कारणीभूत ठरणार आहे, असा विश्वास ढंकर यांनी व्यक्त केला.
भारत-आफ्रिका सहप्रवासी
भारत आणि आफ्रिका यांच्यात इतिहासकाळापासून सहकार्य आहे. या सहकार्याची पाळेमुळे खोलवर पोहचली आहेत. या दोन्ही प्रदेशांसमोरची आव्हाने समान आहेत. इतिहासात त्यांनी समान संघर्ष केला आहे. तसेच त्यांच्या महत्वाकांक्षाही समान आहेत. यामुळे त्यांनी एकत्र काम करण्यास अनुकूल परिस्थिती आहे. त्यांची भागीदारी दोन्ही प्रदेशांना उत्कर्षाकडे घेऊन जाणार असून भविष्यकाळात हे दोन प्रदेश एकमेकांच्या अधिक जवळ येतील. भारताकडून तसे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत, अशी भलावणही ढंकर यांनी केली.
डिजिटल क्रांतीचे महत्व
गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या विश्वव्यापक डिजिटल क्रांतीमुळे अनेक अडथळे दूर झाले आहेत. जगभरात जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये आता डिजिटायझेशनचा प्रसार झाला असून त्यामुळे अनेक समस्या दूर झाल्या. जग अधिक जवळ आले. भारत आणि आफ्रिकेतही ही क्रांती झाली. इतर तंत्रवैज्ञानिक प्रगतीही या काळात मोठ्या प्रमाणात झाली. जागतिक व्यवस्था समानतेच्या तत्वावर चालण्यासाठी ही तंत्रवैज्ञानिक क्रांती उपयोगी पडत आहे. परस्पर लाभ आणि संघटित यश याचा हा परिणाम असून त्यामुळे साऱ्या जगाला लाभ होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रम कशासाठी ?
हा कार्यक्रम आयसीसी या संस्थेने भारताचा विदेश व्यवहार विभाग आणि भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित केला होता. भारत आणि आफ्रिका यांच्यात आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि आफ्रिका यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम साहाय्यभूत ठरला आहे. गुंतवणूक, व्यापार, संस्कृती, तंत्रज्ञान विकास आणि इतर सर्व क्षेत्रांमध्ये आफ्रिकेशी सहकार्य करण्याचा निर्धार भारताने यापूर्वीच व्यक्त केला आहे.
भारत-आफ्रिका सहकार्य लाभदायक
ड भारत आणि आफ्रिका यांच्यातील परस्पर सहकार्य अत्यंत लाभदायक
ड दोन्ही प्रदेशांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्यावर एकमत
ड भारताच्या प्रयत्नांमुळे आफ्रिकन महासंघाला जी-20 चे स्थायी सदस्यत्व









