लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी
वेफर्स आणि नमकीन खाद्यपदार्थांची निमिर्ती करणाऱ्या व्यावसायिकाकडून 45 हजार ऊपयांची लाच घेताना अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनवणे (वय 50, मूळ रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर, सध्या रा. 102, लाईफ स्टाईल अपार्टमेंट, प्रतिभानगर, कोल्हापूर) यांना अटक केली. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही कारवाई केली.
तक्रारदार हा वेफर्स आणि नमकीन खाद्यपदार्थ तयार करणारा व्यावसायिक आहे. त्यांच्या कारखान्याच्या तपासणीसाठी जिल्हा अन्न व औषध प्रशासनचे अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनवणे गेले होते. त्यांनी कारखान्यात तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे काही नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यानंतर सोनवणे यांनी संबंधित व्यावसायिकाकडे त्यांच्याकडे उत्पादीत होणाऱ्या खाद्यपदार्थावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी व कारखान्याच्या परवाना रद्द न करण्यासाठी 45 हजार ऊपयांच्या लाचेची मागणी केली. या मागणीनंतर संबंधित व्यावसायिकाने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बापू साळूंखे यांनी पडताळणी केली. यामध्ये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यावऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षा अधिकारी सोनवणे याच्यावर कारवाई करण्यासाठी मंगळवारी सापळा लावला. यामध्ये सोनवणेला 45 हजार ऊपयांची लाच घेताना रंगेहात पकडून अटक केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सोनवणेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या कारवाईत कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बापु साळुंखे, सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, पोलीस हवालदार विकास माने, सुनील घोसाळकर, पोलीस नाईक सुधीर पाटील, महिला पोलीस नाईक संगीता गावडे, सचिन पाटील आदींनी भाग घेतला.