‘एईपी’नुसार दोन सत्रात परीक्षा : शाळांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी
पणजी : नवीन शैक्षणिक धोरणानुसार चालू वर्षात 2024-25 मध्ये इयत्ता नववीसाठी दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार असून ते काम गोवा बोर्डातर्फे होणार आहे. एकूण 10 विषयात ती परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात तीन भाषा, मॅथेमॅटीक्स, सायन्स, सोशल सायन्स अशा विषयांचा समावेश आहे. सर्व विषयांची परीक्षा 80 गुणांची होणार असून 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी नववीची परीक्षा संबंधित शाळेतून घेण्यात येत होती. तथापि आता इयत्ता नववीपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आल्यामुळे नववीची परीक्षा आता गोवा बोर्डाकडे स्थलांतरित करण्यात आली आहे. पास होण्यासाठी प्रति विषयात 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
नववीच्या या परीक्षेत क्रीडा गुणही विचारात घेण्यात येणार असून त्याचा लाभ घेऊन 33 टक्के गुण मिळवणे पास होण्यासाठी बंधनकारक आहे, असेही सांगण्यात आले. प्रत्येक विषयात पास झाल्यासच क्रीडा गुण देण्यात येणार आहेत. एखाद्या विषयात नापास झाला तर पास होण्यासाठी क्रीडा गुणांचा वापर केला जणार नाही असा खुलासाही करण्यात आला आहे. एक किंवा दोन विषयात नापास झाल्यास आणि इतर एक-दोन विषयात 80 टक्के गुण मिळाल्यास व इतर विषयात किमान 50 टक्के गुण मिळाले तर त्यास पास करण्यात येणार आहे. त्यामुळे क्रीडा गुणांचा लाभ पास करण्यासाठी होईल याची खात्री नाही. बोर्डाने या परीक्षेची मार्गदर्शक तत्वे सर्व शाळांसाठी जारी केली असून उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन शाळेतूनच होणार आहे. गुण बोर्डाकडे पाठवले जाणार आहेत.
बारावीची परीक्षा फेब्रुवारीत, तर दहावीची मार्चमध्ये
गोवा शालान्त मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून बारावीची परीक्षा 1 फेब्रुवारी 2025 पासून तर दहावीची परीक्षा 1 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. या तात्पुरत्या तारखा आहेत. उर्दू माध्यमातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मडगाव, पणजी,वाळपई आणि वास्को अशा चार ठिकाणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. दहावीसाठी सामान्य विषयांची शनिवार 1 मार्च 2025 पासून परीक्षा सुरू होणार आहे, प्रॅक्टिकल परीक्षेसाठी एनएसक्यूएफ विषयांसाठी 4 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होईल. बारावीची लेखी परीक्षा 1 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षा 8 जानेवारी रोजी सुरू होईल. 8 जानेवारीला व्होकेशन कोर्सचे ऑडिट होईल आणि 10 जानेवारीला एनएसक्यूएफ प्रॅक्टिकल सुरू होईल. परीक्षेला बसणाऱ्यांसाठी ऑनलाईन शुल्क भरून अर्ज करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2024 पासून शालान्त मंडळाच्या वेबसाईटवर खुली होणार आहे. परीक्षा देणाऱ्यांनी 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करून शुल्क भरावे लागणार आहे, त्यानंतर अर्ज करणाऱ्यांना लेट फी भरावी लागणार आहे.









