पर्यटकांची पाठ : केवळ एकच फेरी, परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम
बेळगाव : पर्यटकांची गैरसोय दूर होण्यासाठी परिवहनने सोडलेल्या वर्षापर्यटन विशेष बसला प्रतिसाद थंडावला आहे. आतापर्यंत केवळ गोकाक फॉल्ससाठी एकच फेरी झाली आहे. पर्यटकांविना दुसरा शनिवार, दर रविवार आणि शासकीय सुटीदिवशी धावणारी बससेवा थांबवावी लागली आहे. त्यामुळे यंदा परिवहनला वर्षा पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नापासूनही दूर रहावे लागणार आहे. परिवहनकडून दरवर्षी पावसाळ्यात वर्षा पर्यटनासाठी आंबोली, गोकाक फॉल्ससाठी विशेष बसचे नियोजन केले जाते. यंदादेखील दमदार पावसानंतर गोकाक फॉल्ससाठी विशेष बस सुरू करण्यात आली होती. महिन्यातील दुसरा, चौथा शनिवार, दर रविवार आणि शासकीय सुटीदिवशी ही बस सोडण्याचे निश्चित झाले होते. मात्र प्रवाशांविना ही विशेष बस थांबविण्यात आली आहे. केवळ या बसची एकच फेरी गोकाक फॉल्सला झाली आहे. त्यानंतर ही बससेवा ठप्प झाली आहे.
धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित पण…
पर्यटकांना वर्षापर्यटनाचा आनंद लुटता यावा, यासाठी गोकाक, गोडचिनमलकी, हिडकल आदी ठिकाणी भेट देऊन सायंकाळी पुन्हा बेळगावात माघारी परतते. या विशेष बससेवेला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. मात्र यंदा पाऊस अधिक असूनदेखील पर्यटकांचा प्रतिसाद थंडावला आहे. जुलै मध्यानंतर झालेल्या पावसाने नदी, नाले आणि जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होऊन धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. आंबोली आणि गोकाक धबधबाही पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. त्यामुळे परिवहनच्या आंबोली, गोकाक बससेवेला प्रतिसाद मिळेल, असे वाटत होते. मात्र या विशेष बसला पूर्णपणे प्रतिसाद कमी झाला आहे.
प्रवाशांविना बससेवा ठप्प
गोकाक विशेष बससेवेला पर्यटकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ही बससेवा सध्या थांबविण्यात आली आहे. केवळ सुरुवातीला एकच फेरी गोकाकला गेली होती. त्यानंतर प्रवाशांविना बससेवा थांबली आहे.
-के.के.लमाणी, डीटीओ, बेळगाव









