ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे समस्या : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बेळगाव : शहर परिसरात अद्यापही डेंग्यूची लागण सुरूच आहे. त्यातच सर्वत्र अस्वच्छता व ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अलीकडेच पडलेल्या मुसळधार पावसामुळे नानावाडीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी मिलिटरी महादेवनजीक पाणी साचून राहिले होते. तसेच संपूर्ण नानावाडीमध्ये ठिकठिकाणी पाणी साचून राहिले आहे. नानावाडीचा विस्तार वाढला तरी ड्रेनेजची समस्या, पक्क्या गटारीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. तसेच अनेक जणांनी येथे जागा घेऊन ठेवली असून येथे बांधकाम नसल्याने तण वाढले आहे. काही ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. परिणामी येथे अनारोग्य वाढत असून नानावाडी परिसरात सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी याने बहुसंख्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
नानावाडीसह संपूर्ण शहर परिसरातच थोड्या फार फरकाने हे चित्र दिसत आहे. नानावाडीपासूनच जवळ नालाही वाहतो. तो स्वच्छ न केल्याने आसपासच्या परिसरात अनारोग्य निर्माण झाले आहे. शहरातील इतर भागातील नाल्यांचीही अशीच दुरवस्था झाली आहे. शिवाय ठिकठिकाणी खड्ड्यात पाणी साचले असून कचऱ्याचे ढीगही आहेत. या सर्वांचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला आहे. दिवसेदिवस आरोग्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. यावर फक्त मुरुम टाकून खड्डे बुजविणे हा उपाय नसून कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.









